
हडपसर-यवत उन्नत मार्ग भैरोबा नाल्यापासूनच सुरू करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
पुणे : सोलापूर रोडवरील वाहतुकीचा प्रचंड ताण आणि भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता, हडपसर-यवत उन्नत मार्ग आता हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून सुरू करण्यात यावा, तसेच या उन्नत मार्गावर भविष्यात मेट्रोचा मार्ग ठेवण्याची तरतूद करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा बैठकीत दिले. या निर्णयामुळे पुणे मेट्रोचा विस्तार थेट यवतपर्यंत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधान भवनात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांसह विविध उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरही बैठकीत सहभागी होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे–शिक्रापूर, पुणे–खेड आणि पुणे–यवत असे तीन उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी काही मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ उभारणार आहे.
या प्रकल्पासाठी भैरोबा नाल्यापासूनच काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत होती.
सध्या सोलापूर रोडवर भैरोबा नाला ते हडपसर हा भाग गंभीर वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू आहे. जर उन्नत मार्ग हडपसरपासूनच सुरू झाला, तर हा बॉटलनेक तसाच राहून प्रवाशांना तासाभराचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार होता. मात्र उन्नत मार्गाचा आरंभच भैरोबा नाल्यापासून करण्यास मान्यता मिळाल्याने फातिमानगर, भैरोबा नाला, हडपसर परिसरातील सुमारे दोन लाख नागरिकांना थेट फायदा होणार आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. यवतपर्यंत मेट्रोचा संभाव्य विस्तार सुलभ होण्याची शक्यता असून ग्रामीण भागाशी शहराचे गतिमान जोडण अधिक मजबूत होईल.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयामुळे सोलापूर रोडवरील वाहतूक नियोजनाला नवी दिशा मिळाली असून, मेट्रो आता शहराबाहेर ग्रामीण भागाकडेही सरकणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.






