
तरुणाकडून सव्वा लाखांचा मेफेड्रॉन जप्त
खडक पोलिसांची मध्यरात्री स्वारगेटजवळ कारवाई करुन दोघांना केली अटक
पुणे : मॅफेड्रॉन विक्रीसाठी मध्यरात्री ग्राहकाची वाट पाहत थांबलेल्या दोघांना पकडून खडक पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख २३ हजार ६०० रुपयांचा एम डी आणि कोयता जप्त केला आहे.
अब्दुल अकबर खान (वय १९, रा. पर्वती, दत्तवाडी), धीरज उर्फ गुड्डू नीलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व इरफान नदाफ हे शुकवारी रात्री गस्त घालत शिवाजी रोडने स्वारगेटकडे जात होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्वामी मंदिराजवळ ते पोहचले़ तेथे रोडवर दोघे जण उभे होते. एकाच्या हातातील कॅरी बॅग मध्ये काहीतरी होते. पोलिसांना पाहताच तो कावरा बावरा झाला. ती कॅरी बॅग खिशात ठेवू लागला. आशिष चव्हाण व इरफान नदाफ यांनी संशयावरून त्यांना पकडून ठेवले. पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांना कळवले. लोंढे तेथे पोहचले. त्यांनी अब्दुल खान याची झडती घेतली असता त्याच्याकडे १लाख २३ हजार ६०० रुपयांचा ६ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) आढळून आला. धीरज कदम यांच्या झडतीत एक कोयता मिळून आला. दोघांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत़




