
पुणे, दि. २१ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाची (सन २०१९–२०२१ बॅच) माजी विद्यार्थिनी सृष्टी सुरेश पाटील यांची टायटन्स स्पेस इंडस्ट्रीज (TSI) येथे संशोधन व विकास अंतराळवीर उमेदवार (ASCAN) म्हणून निवड झाली आहे. पुढील चार वर्षांत त्या अंतराळयान प्रणाली, कक्षीय यांत्रिकी, बाह्यवाहन क्रिया (EVA), सूक्ष्मगुरुत्व संशोधन आणि इतर अनेक स्वरुपाचे प्रशिक्षण घेणार आहेत. सन २०२९ मध्ये पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा घालणे हे त्यांच्या पहिल्या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असणाऱ्या या अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड व्हावी हे अनेकांचे स्वप्न असते. सृष्टी पाटील यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने ही दुर्मिळ संधी मिळवली आहे.
जैवविविधता अभ्यासक्रम हा आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सृष्टी पाटील मानतात. महाविद्यालयातील शैक्षणिक सहलींमधून मिळालेला प्रत्यक्ष अनुभव आणि सखोल सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासामुळे संशोधनाची पायाभरणी झाली. आपल्या प्रबंध कार्यामध्ये मार्गदर्शन केलेल्या डॉ. सोनाली शिंदे यांच्या योगदानाबद्दल त्या विशेष कृतज्ञता व्यक्त करतात, “मास्टर्स करताना मला स्वतंत्र संशोधन कसे करावे हे शिकायला मिळाले, आणि आजही तीच पायाभरणी माझ्यासोबत आहे.”
पदव्युत्तर शिक्षणानंतर सृष्टी यांनी रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि खगोलजीवशास्त्रातील (Astrobiology) डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर त्यांची रिसर्चसॅट (ResearchSat Pty Ltd) येथे अंतराळ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Space Microbiologist) म्हणून निवड झाली आणि त्यांनी अंतराळ संशोधन प्रयोगांवर काम करण्यास सुरवात केली. सध्या त्या आरसॅट स्पेस टेक्नॉलॉजीज येथे मुख्य वैज्ञानिक अधिकारी (Chief Scientific Officer) म्हणून कार्यरत असून, त्या जीवनविज्ञानाशी संबंधित प्रयोगांसाठी अंतराळ मोहिमांचे पेलोड डिझाइन व विकास करतात.
अंतराळवीर उमेदवार म्हणून निवडीबद्दल बोलताना सृष्टी पाटील म्हणाल्या, “टायटन्स स्पेस इंडस्ट्रीजच्या २०२९ च्या मोहिमेसाठी माझी निवड होणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. जैवविविधतेपासून अंतराळ सूक्ष्मजीवशास्त्रापर्यंतच्या माझ्या प्रत्येक टप्प्याने मला या क्षणासाठी तयार केले आहे.”






