
१३ वर्षाच्या मुलीवर केले होते लैंगिक अत्याचार
पुणे : गावाकडील नातेवाईक असलेल्या नराधमाने एका १३ वर्षाच्या मुलीशी वारंवार शारीरीक संबंध साधून तिला ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीला ताप आल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रक्त चाचणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत या मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कर्नाटकात राहणाऱ्या २४ वर्षीय या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून आतापर्यंत पुण्यात तसेच कर्नाटकातील त्यांच्या गावी घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व तिची १३ वर्षाची मुलगी हे खडकी परिसरात रहायला आहेत. त्यांच्या कर्नाटकातील गावाकडील लांबचा नातेवाईक आरोपीने या मुलीला बोलावून घेऊन तिच्याशी जवळीक निर्माण केली. तिच्यावर गावी तसेच पुण्यात वारंवार शारीरीक संबंध ठेवले. ही मुलगी घरातून निघून गेली होती. त्यामुळे खडकी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
तिचा शोध घेऊन पुण्यात आणले. तिला मुंढवा येथील महिला आश्रमात ठेवले होते. तेथे असताना तिला ताप आला. तेव्हा तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ससून रुग्णालयात तिची रक्तचाचणी केली. त्यात ती ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्ह्यातील घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये घडली असल्याने खडकी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तो समर्थ पोलीस ठाण्यात हस्तांतरीत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोषी जाधव तपास करीत आहेत.