
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी
चॉकलेटचे आमिष दाखवून केले होते अमानुष कृत्य, कोंढवा पोलिसांची कामगिरी
पुणे : अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून रुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती रक्कम पिडित मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत.
अनिस नैस मोहम्मद (वय ३६, रा. अडंर कन्स्ट्रक्शन रुम, कृष्णानगरजवळ, मोहमंदवाडी) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना १७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी दहा वाजता घडली होती.
अल्पवयीन मुलगी ही खेळत असताना अनिस याने तिला चॉकलेट देण्याचे सांगून त्याच्या रुममध्ये घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. कोंढवा पोलिसांनी पॉक्सो खाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्यात सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी सहायक फौजदार महेश जगताप, विजय माने, अंकुश बनसोडे यांनी पाहिले. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दत्तक केस अधिकारी म्हणून काम पाहिले.
विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी पॉक्सो अॅक्टखाली २० वषार्ची सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली. आरोपी हा १७ सप्टेंबर २०१९ पासून तुरुंगात आहे. जर त्याने दंडाची रक्कम भरली तर ती पिडित मुलीला देण्यात यावी, असे निकालात म्हटले आहे .
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास अधिकारी आणि कोर्ट पैरवी करणारे पोलीस अंमलदार यांनी १० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.