
नवीन बोगद्यामध्ये ट्रकवर आदळली प्रवासी बस : ८ प्रवासी गंभीर तर १८ प्रवासी किरकोळ जखमी
पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे. ट्रक आणि बसच्या अपघातात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर, १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई मार्गिकेवरील नवीन बोगद्यामध्ये घडला.
मनीषा भोसले, सुनिता तराळ, बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक), संकेत सत्तपा घारे, (सह चालक), अभिजित दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे, सोनाक्षी कांबळे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर, सना बडसरिया, शिवांश, तनिष्का, हर्ष, अद्विका, गरिमा पाठक, प्राची, श्रेया, समीक्षा, साक्षी रेपे, मानसी लाड, जोहा अन्सारी, अमित शहा, दीक्षा, चेतन भोपळे, माही, शौर्य, आदिल अशी किरकोळ जखमींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक महेश भिमरेड्डी मुसाने (वय ३१, रा. गडीगोंडगाव, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) हा ट्रक क्रमांक केए ५६, ५६७५ ही गाडी घेऊन जात होता. त्याच्या ट्रकच्या ब्रेकची हवा उतरली होती. त्यामुळे त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभी केली होती.
त्यानंतर काही वेळाने बालाजी बळीराम सूर्यवंशी (वय ४१, रा. खराबवाडी, वायगाव, अहमदपूर, लातूर) हे एमएच ०३, डीव्ही २४१२ ही बस घेऊन निघालेले होते. त्यांना अचानक ट्रक समोर दिसला. त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ही बस ट्रकवर पाठीमागून जोरात जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर, १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातातील गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये स्वामिनी ॲम्बुलन्स सेवेच्या माध्यमातून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे हलवण्यात आले.
या अपघातातील बस व ट्रक ही दोन्ही वाहने ‘आयआरबी’कडील हायड्राच्या व पुलरच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून तिनही लेन वरील वाहतूक सुरळीत सुरू करून देण्यात आली. या अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना ‘आयआरबी पेट्रोलिंग’ ‘देवदूत यंत्रणा’ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावली. तसेच डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढले. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.