
डॉमीकल्चर फॅसिलिटीज कंपनीच्या संचालकांकडून
पुणे : कॅश क्रेडिट आणि टर्म लोन मंजूर करण्याकरता विक्री केलेले तीन फ्लॅट गहाण ठेवून बँक ऑफ महाराष्ट्राची ५ कोटी ७५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉमीकल्चर फॅसिलिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२० ते मे २०२४ या कालावधी दरम्यान घडला.
विजय बाबुराव अनपट (वय ४७, रा. आसावरी,नांदेड सिटी), अनिल मारुती अनपट (रा. सेक्टर १६, वाशी, नवी मुंबई), प्रियांका बाबासाहेब जाधव (रा. वाई, सातारा), विशाल शंकर जायगुडे, बाबासाहेब तुकाराम जाधव (वय ४९, सर्व रा. वाई, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एरंडवणा शाखेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर कांचनलता त्रियोगीनारायण पांडेय (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यांची डॉमीकल्चर फॅसिलिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे.
या सर्व आरोपींनी बँकेकडून कॅश क्रेडिट आणि टर्म लोन मंजूर करून घेतले होते. हे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी बँकेकडे आठ सदनिका गहाण ठेवलेल्या होत्या. यातील तीन सदनिकांची त्यांनी यापूर्वीच विक्री केलेली होती. मात्र, बँकेला फसवण्याच्या उद्देशाने तसेच त्या फ्लॅट्सवर कोणताही अधिकार नसताना सुद्धा हे फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवले आणि त्याचे कॅश क्रेडिट खात्यात जमा करून घेतले. तसेच, कंपनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहाराबाबत बँकेला कल्पना न देता परस्पर गोदामा मधील माल बँकेच्या संमतीशिवाय विक्री करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५ कोटी ७५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.