
पुणे : शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यापूर्ण प्रयत्नांमुळे दुर्लभ यकृत विकाराने ग्रस्त असलेल्या एका दीड वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. साधारण एका महिन्यापासून त्याला त्रास होत होता. या मुलावर लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या स्थितीमध्ये सकारात्मक सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील कराडमधील एका कुटुंबामधील लहान मुलाला जन्मापासूनच आरोग्यविषयक अनेक समस्या होत्या. यामध्ये पिवळसरपणा, सतत खाज सुटणे, वजन कमी होणे असे लक्षणे दिसत होती. इतर लक्षणांमध्ये झोप न लागणे व वाढ थांबल्याची गंभीर समस्या होती. जन्मापासून सुमारे १८ महिन्यांच्या वयात त्याचे योग्य वजन साधारणपणे ९.८ ते १२.२ किलो असणे अपेक्षित होते. मात्र, त्याचे वजन अंदाजे ८.५ किलोच्या आसपास होते.
त्याच्या पालकांनी डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. रुग्णालयीन तपासणीत यकृताचा बायोप्सी करण्यात आला आणि यकृतामध्ये गंभीर आजार आढळून आला. प्रथम औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती हळूहळू खालावत गेली. त्याला Progressive Familial Intrahepatic Cholestasis (PFIC) दुर्मिळ आजार असल्याचे निदान करण्यात आळले.
कुशल डॉक्टरांच्या चमूने मुलाला २९ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करून घेतले. त्याच्या वडिलांनी त्याला यकृताचा काही भाग दिला. त्याच्यावर ३० जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशवी झाली. या मुलाला १८ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता त्याची खाज पूर्णतः कमी झाली आहे, झोप येण्यास त्रास होत नाही आणि यकृताच्या चाचणीमध्ये परिणाम देखील सुधारल्याचे दिसत आहे.