
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई करत सहकारी सोसायटीतील तब्बल ८ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणाचा पर्दाफाश केला. सहकार विभागाकडून नेमण्यात आलेले लिक्विडेटर विनोद देशमुख आणि सरकारी पॅनलवरील ऑडिटर भास्कर पोळ यांना ३० लाखांचा ‘अॅडव्हान्स’ स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटीच्या सभासदत्वावरून जुने आणि नवीन सभासदांमध्ये गेल्या काही वर्षांत वाद निर्माण झाला. २०२४ मध्ये सहकार विभागाने सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढून देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती केली. फिर्यादी आणि इतर ३२ नवीन सभासदांनी २०२३ मध्ये शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. मात्र, तक्रारदारांचा अर्ज प्रलंबित ठेवला गेला. सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांनी चौकशी केली तेव्हा ऑडिटर भास्कर पोळ यांनी शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी ३ कोटी रुपये आणि भावी लिलाव प्रक्रियेत इच्छित व्यक्तीस प्लॉट देण्यासाठी ५ कोटी रुपये अशी एकूण ८ कोटी रुपये लाच मागितली. त्यांनी पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये तातडीने देण्याची मागणी केली.
५ डिसेंबर रोजी लाच पडताळणीदरम्यान आरोपींनी स्पष्टपणे ८ कोटींची मागणी केली हे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी ६.५५ वाजता शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर भास्कर पोळ आणि लिक्विडेटर विनोद देशमुख यांनी ३० लाखांची लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. विश्रामबाग लीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.







