
भारती विद्यापीठ पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास : ३२० सीसीटीव्ही, १२०० ऑटोरिक्षा, रेकॉर्डवरील १५० आरोपींची तपासणी
पुणे : असे म्हणतात की, खून लपून रहात नाही… खुनाला वाचा फुटतेच… एका महिलेच्या खुनाला देखील अशीच वाचा फुटली. २० मे रोजी झालेल्या खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, सुगावा लागत नव्हता. तपासादरम्यान सीसीटीव्ही तपासात एका चित्रीकरणात वीज चमकल्यामुळे संशयित ऑटोरिक्षा दिसत असल्याचे समोर आले. आणि इथूनच खुनाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी तब्बल ३२० सीसीटीव्ही, १२०० ऑटोरिक्षा आणि अभिलेखावरील १५० आरोपींची तपासणी करून अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या. अलीकडच्या काळात अशा प्रकारे उघडकीस आलेला हा दुर्मिळ गुन्हा आहे.
शाहरुख शकील मन्सुर (वय २७, रा. अमखेरा, बिजनोर, उत्तरप्रदेश, सध्या रा. सय्यदनगर, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वीचे जबरी चोरी, चोरी असे एकूण ५ गुन्हे कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला ही वेश्या व्यवसाय करणारी होती. या महिलेचा मृतदेह २० मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील धबाडीमधील शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सेवा रस्त्यावर आढळून आलेला होता. तिच्या डोक्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आलेले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर विलास कदम (वय ४२) यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल कुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांनी पथकासह महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. तिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तिने दुचाकीवरून प्रवास केल्याचे समोर आल्यानंतर कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये ही महिला दुचाकीवरुन नवले पुलावर आल्याचे समोर आले. नवले पूल परिसरातील ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. घटनेच्या दिवशी (दि. २० मे) रोजी भरपूर पाऊस पडत होता. सार्वजनिक रस्त्यावर अपुरा प्रवास असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात असताना एके ठिकाणी वीज चमकल्यामुळे निर्माण झालेल्या प्रकाशात ही महिला एका ऑटो रिक्षामध्ये बसताना दिसली. रिक्षाच्या वर्णनावरुन शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. आरटीओकडून विशिष्ट कंपनीच्या पुणे शहरामध्ये नोंदणीकृत असलेल्या १० हजार ७९४ रिक्षांची माहिती घेण्यात आली. त्यापैकी १२०० रिक्षांच्या दंडात्मक कारवाईची माहिती वाहतूक विभागाकडून घेण्यात आली. त्याचे फोटो मिळवण्यात आले. संशयास्पद रिक्षाचा नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या महामार्गावर १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शोध घेण्यात आला. पोलिसांना रिक्षा व रिक्षाचालक शाहरुख मन्सुर याची ओळख पटविण्यात यश आले. पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशमधील बिजनोर येथील अमखेरा येथे पोचले. तब्बल ३२०० किलोमीटरचा प्रवास करून अखेर शाहरुख मन्सुरला 9 जून रोजी धामपूर येथे बेड्या ठोकण्यात आल्या. ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासाची व्याप्ती मोठी
आरोपीचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळ, कोल्हेवाडी, नांदेड सिटी, पुल, वंडरसिटी भागातील सुमारे ३२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. तब्बल १२०० ऑटो रिक्षांची तपासणी केली. तसेच, अभिलेखावरील १५० आरोपींची तपासणी करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ३२०० किलोमीटरचा प्रवास केला.