
काँग्रेस नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने १९८४ च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार यांना याआधीच दिल्ली उच्च न्यायालयाने याच दंगलीशी संबंधित एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्यामुळे आता जिल्हा न्यायालयाने आणखी एका प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर शीख दंगलीत त्यांच्या मोठ्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
म्हणूनच हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते की सज्जन कुमार नक्की कोण आहेत? 1984 च्या शीख दंगलीत त्यांची काय भूमिका होती? कोणत्या आरोपांखाली त्यांच्यावर खटले चालवले गेले आणि कोणत्या न्यायालयांनी त्यांना दोषी ठरवले, तर कुठे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले? सद्यस्थितीत या प्रकरणांमध्ये काय सुरू आहे? चला जाणून घेऊया…
1984 ची शीख विरोधी दंगल काय होती?
1984 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर शीख विरोधी दंगली उसळल्या होत्या. जून 1984 : भारतीय सैन्याने “ऑपरेशन ब्लू स्टार” अंतर्गत अमृतसरच्या स्वर्ण मंदिरावर कब्जा केलेल्या अतिरेकी जर्नेल सिंह भिंडरांवाले आणि त्याच्या समर्थकांचा खात्मा केला. या मोहिमेला इंदिरा गांधी यांनी मंजुरी दिली होती, त्यामुळे काही शीख समुदायातील लोक संतप्त झाले होते.
– 31 ऑक्टोबर 1984 : इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. यानंतर संपूर्ण देशभर शीख विरोधी दंगली उसळल्या. यामध्ये 3,000 ते 5,000 लोक मारले गेल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये फक्त दिल्लीमध्येच सुमारे 2,000 शीखांचा बळी गेला.
सज्जन कुमार यांची शीख दंगलीतील भूमिका
दिल्लीमध्ये सुलतानपुरी, कँट आणि पालम कॉलनी या भागांमध्ये शीखांविरोधात दंगल भडकवण्यामध्ये सज्जन कुमार यांचे नाव आले.
-1 नोव्हेंबर 1984 रोजी, सज्जन कुमार यांनी कथितरित्या जमावाला उद्देशून सांगितले होते – “आमची आई मारली गेली, सरदारांना मारून टाका.”
– अनेक साक्षींनुसार, सज्जन कुमार यांनी शीखांच्या घरांची ओळख पटवून, जमावाला त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
– काही आरोपांनुसार, त्यांच्या समर्थकांनी मतदार यादीचा वापर करून शीखांच्या घरांचा आणि व्यवसायांचा शोध घेतला आणि ते उद्ध्वस्त केले.
सज्जन कुमार यांच्यावर कोणते खटले दाखल झाले आणि न्यायालयीन निकाल काय लागले?
– 2002 : शीख दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले.
– 2005 : जी. टी. नानावटी आयोगाच्या अहवालाच्या आधारावर सीबीआयने त्यांच्यावर नवा खटला दाखल केला.
– 2013 : दिल्लीतील कडकोडुमा कोर्टाने त्यांना दोषमुक्त केले, मात्र या प्रकरणात इतर पाच जणांना शिक्षा झाली. यावर पीडित पक्षाने जोरदार निषेध केला होता.
– 2018 : दिल्ली उच्च न्यायालयाने एका वेगळ्या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सद्यस्थिती: सज्जन कुमार यांना आणखी एका प्रकरणात जन्मठेप
दिल्लीच्या सरस्वती विहार येथे 1 नोव्हेंबर 1984 रोजी जमावाला भडकवून दोन शीखांची हत्या घडवून आणण्याच्या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
– पीडित जसवंत सिंग यांच्या पत्नीने सज्जन कुमार यांच्याविरुद्ध साक्ष दिली.
– सीबीआयने न्यायालयात सांगितले की, सज्जन कुमार यांनी शीखांच्या घरी जाळपोळ आणि लूटमार घडवून आणली, तसेच दोन शीखांना जिवंत जाळण्यात आल्याचे पुरावे सादर केले.
– 1991 मध्ये याच प्रकरणाची पहिली एफआयआर दाखल झाली होती, जी एका साक्षीदाराच्या 1985 च्या प्रतिज्ञापत्रावर आधारित होती.
2014 मध्ये मोदी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने 1984 शीख दंगलीशी संबंधित प्रकरणांची नव्याने चौकशी सुरू केली, आणि त्यानंतर हा नवा निकाल लागला.