
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई : चार पिस्तुलांसह ६ जीवंत काडतुसे जप्त
#पुणे : कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने विधानसभा निवणुकीच्या मोठी कारवाई केली असून बेकायदा शस्त्रसाठा पकडला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खडी मशीन चौकात केलेल्या कारवाईत चार बेकायदा पिस्तुले आणि ६ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी तीनजणांना अटक करण्यात आली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे.
स्वप्नील दगडू भिलारे (वय २६, रा. वि्ठल मंदिर शेजारी, विठ्ठलवाडी, पौड), सलमान शेरखान मुलाणी (वय ३४, रा. चिन्मय हॉटेल समोर, खाटीकओढा, पौड), आदित्य संदिप मत्रे (वय १९, रा. भरेगाव, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची दुचाकी आणि एक मोटारसायकल, ४ देशी बनावटीचे पिस्तुले, ६ जीवंत काडतुसे असा एकूण २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी अंमलदार विशाल मेमाणे यांना खबऱ्याने आरोपी खडी मशीन चौकामधून जाणार असून त्यांच्याकडे बेकायदा शस्त्र असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे खडीमशीन चौकामध्ये सापळा लावण्यात आला. साधारण पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी दोन दुचाकी गाड्यांवरून पिसोळीच्या दिशेने जाताना दिसले. हे सर्वजण खडीमशीन चौकातील नवीन रस्त्याने इस्कॉन मंदिराच्या दिशेने जाऊ लागताच पोलिसांनी सर्वांना थांबवले.
त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अंगझडती घेतली. तेव्हा भिलारेच्या कंबरेला मागील बाजुस खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. तर, पँटच्या पुढील बाजूस उजव्या खिशामध्ये २ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच, त्याच्य दुचाकीच्या डिकीमध्ये देशी बनावटीची आणखी ३ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उपआयुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार सुजित मदन, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, सागर भोसले व शाहिद शेख यांनी केली.