
श्रीनगर / किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपोरा परिसरात रविवारी सुरक्षा दल आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात जैश-ए-मोहम्मद संघटनेचे २ ते ३ दहशतवादी दडलेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील चात्रू पट्ट्यातील सोनार गावाजवळील मंद्राल–सिंगपोरा परिसरात रविवारी शोधमोहीम सुरू असताना अचानक चकमक उडाली. या दरम्यान जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला आणि उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. इतर सात जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोमवारी पुन्हा शोधमोहीम सुरू
रात्री उशिरा अंधार आणि अवघड भूभागामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र सोमवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दाट जंगल, हिरवीगार वनराई आणि तीव्र उतारामुळे दृश्यता आणि हालचालींवर मर्यादा येत असल्याने रविवारी रात्री मोहीम स्थगित करण्यात आली होती.
सध्या लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलांची अनेक पथके परिसरात तैनात करण्यात आली आहेत. ड्रोन आणि शोधक श्वानांच्या मदतीने परिसराची कसून झडती सुरू असून, दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी कडक सुरक्षा घेरा घालण्यात आला आहे.
जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी दडल्याचा संशय
सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित २ ते ३ दहशतवादी या परिसरात दडलेले आहेत. पहाटे उजाडताच मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून, शेवटच्या वृत्तानुसार अद्याप दहशतवाद्यांशी नव्याने संपर्क झालेला नाही. परिसरात अजूनही सतर्कता कायम ठेवण्यात आली असून, शोधमोहीम सुरूच आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
#KishtwarEncounter, #JammuKashmirNews, #ArmyMartyr, #TerrorAttack, #JaishEMohammed,
#IndianArmy, #BreakingNews, #KashmirUpdates, #SecurityForces, #CounterTerror,
#MarathiNews, #NationalSecurity, #EncounterNews, #DefenceNews, #Terrorism






