
पुण्याच्या फुरसुंगीमध्ये खळबळजनक घटना
पुणे : पती बाहेरगावी गेल्यानंतर अज्ञात इसमाने त्याच्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खळबळ उडवून देणारी ही घटना फुरसुंगी येथे घडली आहे.
स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नाली पवार या आपल्या राहत्या घरी बेडमध्ये बेशुद्धावस्थेत मिळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नंतर फुरसुंगी बीट मार्शल यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव व त्यांचे सहकारी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली पवार यांचे पती उमेश पवार (वय ३६, रा. लव्हेगाव पो. अकुलगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. उमेश पवार हा उबर टॅक्सीचालक आहे. त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता ते गाडी घेऊन निघून गेले होते. त्याच रात्री ते भाडे सोडून परत आला असता त्याच्या घराला बाहेरुन कडी होती. त्यांनी दरवाजा उघडून घरात पाहिले तर पत्नी दिसून आली नाही. म्हणून त्यांनी दुचाकीवरून परिसरात पत्नीचा शोध सुद्धा घेतला़ परंतु ती सापडली नाही.