
भिक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून धाराशिव जिल्ह्यात कारवाई
पुणे : भीक मागण्याच्या उद्देशाने पुण्यामधून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षीय चिमुकलीची धाराशिव जिल्ह्यामधून सुखरूप सुटका करण्यात आली. मुले पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली.
सुनिल सिताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा, तुळजापुर, धाराशीव), शंकर उजन्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५), गणेश बाबु पवार (वय ३५, सर्व रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव), मंगल हरफुल काळे (वय १९, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वंडर सिटी झोपडपट्टीमधून २५ जुलै रोजी रात्री नऊ ते २६ जुलै दरम्यान मध्यरात्री दीडच्या दरम्यान दोन वर्षीय चिमुकलीला झोपेमधून उचलून पळवून नेण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिडीत मुलीचा तात्काळ शोध घेण्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन पथके तयार केली. तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके, बाहेरील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करून तपासाला सुरुवात करण्यात आली. कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यान असलेल्या सर्व रस्त्यांवरील आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यातील काही फुटेजमध्ये दोन पुरुष व एक महीला दुचाकीवरुन पिडीत मुलीला घेऊन जात असल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याचा शेवटपर्यंत माग काढण्यात आला. तेव्हा आरोपी मुलीला पुणे रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलीला पळवून नेणाऱ्या तीन व्यक्ती आणि त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींचे चेहरे स्पष्ट करुन त्या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात करण्यात आली. आरोपी तुळजापुरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होताच भारती विद्यापीठ तपास पथक व गुन्हे शाखेचे युनिट ०२ यांच्या पथकांना तात्काळ रवाना करण्यात आले. धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. कौशल्यपुर्ण पध्दतीने आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे पिडीत २ वर्षाची मुलगी सुखरुप मिळून आली. आरोपींनी पिडीत मुलीस भिक मागण्याकरता अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) निखील पिंगळे, उपआयुक्त (परिमंडळ २) मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाटगे, अंजुम बागवान सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, जाधव, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, सद्दाम तांबोळी, शुभम देसाई, मयुर भोसले, निलेश साबळे, अमित जमदाडे तसेच धाराशिव एलसीबीचे हवालदार समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली.