
साधेपणा आणि नम्रतेने जिंकले चाहत्यांचे मन
#मुंबई : सुपरहिट ठरलेल्या भूलभुलैय्या ३ च्या घवघवीत यशानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने मंगळवारी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी कार्तिक अत्यंत साध्या वेषात आलेला होता. त्याने याठिकाणी आलेल्या भक्तांशी नम्रतेने संवाद साधला. त्याच्या या साधेपणा आणि नम्रतेमुळे चाहत्यांनी कौतुक केले. तसेच, त्याच्या चांगल्या वर्तणूकीची सोशल मीडियावरही चर्चा झाली.
अवघ्या १५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या भूलभूलैया चित्रपटाने आतापर्यंत २४७.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर अद्यापही या सिनेमाचा बोलबाला आहे. कार्तिक आर्यन याच यशाच्या निमित्ताने गणपती बप्पाच्या दर्शनासाठी आला होता. मंदिराच्या बाहेर येताच चाहत्यांनी कार्तिकचे मनापासून स्वागत केले. एका चाहत्याने त्यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तसेच, त्याच्यासोबत फोटो देखील काढले.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कार्तिक आर्यन याने अतिशय साधा लूक ठेवलेला होता. त्याने ओव्हरसाईझ बेबी पिंक रंगाचा शर्ट, डॅमेज जीन्स आणि कोल्हापुरी चप्पल घातली होती. हा साधा लूक असूनही कार्तिक खूपच आकर्षक दिसत होता.
मंदिरातून बाहेर पडताना चाहत्यांनी त्याला सेल्फीसाठी घेरले. कार्तिकनेही कोणालाही नाराज न करता प्रत्येकासोबत सेल्फी काढली. विशेषतः जेव्हा एका महिला चाहत्याने गर्दीतून धडपड करत त्यांच्याशी फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा कार्तिकने तिला गाडीपर्यंत येऊ दिले. गाडीतूनच त्या महिलेचा हात धरून त्यांनी फोटो काढला. त्याच्या या कृतीने उपस्थित सर्वांचेच मन जिंकले. कार्तिक आर्यनचा हा साधेपणा आणि चाहत्यांप्रती असलेला स्नेह त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमागचे मोठे कारण ठरते.