
साताऱ्यासह राज्यभरात उडाली खळबळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
#सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन देण्याकरिता आणि आरोपीच्या बाजूने निकाल देण्याकरिता तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी थेट अतिरिक्त सत्र न्यायाधीशावरच कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय लक्ष्मणराव निकम असे जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे नाव आहे. यासोबतच किशोर संभाजी खरात (रा. बीडीडी चाळ, वरळी, मुंबई) आणि आनंद मोहन खरात ऊर्फ सम्राट जाधव (रा, खरातवाडी, दहीवडी, सातारा) या दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७ अ, १२ सह भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात २६ ऑक्टोबर २०२४ रोजी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सातारा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. हा जामीन अर्ज न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयात सुनावणीकरिता प्रलंबित आहे.
हा जामीन मंजूर करून तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी खासगी व्यक्ती किशोर खरात आणि आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यावरून निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची एसीबीने ३ डिसेंबर आणि ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यामध्ये निकम यांच्याकरिता खरात यांनी लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. निकम यांनीच या दोघांशी संगनमत करून लाचेची मागणी केली असल्याचे समोर आले. त्यानुसार एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. तब्बल पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीशांसह तीघांवर गुन्हा दाखल झाल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.