
घरात दोन दिवस डांबून ठेवत केले अत्याचार : विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना बेड्या
पुणे : एका महिलेचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी नराधमतेचा कळस गाठण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ३२ वर्षीय महिलेला ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी धमकावण्यात आले. तिला घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघाजणांनी बलात्कार केला. विमाननगर परिसरातील धानोरीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पिडीत महिलेच्या घरातील देव्हारा आणि देवांची नासधूस करण्यात आली. एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
संतोष रामदास गायकवाड (वय ५५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, धानोरी), सागर मधुकर लांडगे (वय ३०,रा. गल्ली क्रमांक ३, माधवनगर, धानोरी) या दोघांसह एका महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२४ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीदरम्यान वेळोवेळी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी पीडित महिलेला भुलथापा देत ख्रिश्चन धर्मात ये असे म्हणत धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली. तिला गोड बोलून धानोरी परिसरात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर, आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरामध्ये तिला डांबून ठेवण्यात आले.
आरोपी गायकवाड आणि लांडगे या दोघांनी पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला. तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. ही चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी तिला धमकी देण्यात आली. आरोपी लांडगे हा पीडित महिलेला लोहगाव परिसरात घेऊन गेला. तेथे देखील तिला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिला धमकावत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे करत आहेत.