
पीएमपी बसमधून होणार मतदान साहित्याची वाहतूक
पुणे : स्वारगेट आणि परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेने दिली आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील केंद्रातून मतदान यंत्र आणि मतदान साहित्याची वाहतूक पीएमपी बसमधून केली जाणार आहे. त्याकरिता स्वारगेट परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मंगळवार (१९ नोव्हेंबर) आणि बुधवार (२० नोव्हेंबर) असे दोन दिवस हे बदल लागू केले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
मतदान यंत्र आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी पीएमपी बसचा वापर केला जाणार आहे. येत्या बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. त्याकरिता प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. ही यंत्रे व साधनसामुग्री सर्व मतदान केंद्रांवर पोचविण्याचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता स्वारगेट परिसर ते नेहरु स्टेडीयम परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देणात येणार आहे.
तर, बुधवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर संध्याकाळी सहा ते रात्री बारा यावेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील ग्रेट सेपरेटर वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मतदान साहित्य श्री गणेश कला क्रींडा रंगमच येथील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनरायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.