
कोकणातील दाट जंगल,भरपूर पर्जन्यमान, कडे कपारीच्या साथीने पूर्वजांनी आपले जीवन या भूमीत नव्याने सुरू केले. कोकणातले जीवन जगणे हा प्रकार खूपच आनंददायी असतो. मात्र, ते जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे व तशी संधी मिळालीच तर तिचा लाभ घेता आला पाहिजे. खाली कोकणी जीवनातील काही वैशिष्ठ्यपूर्ण व आनंददायी अनुभवांची यादी दिली आहे. या यादीला चेकलिस्ट मानून आपण यातले काय अनुभवले आहे ते तुम्ही स्वत:च ठरवा.
कधी झाडावर चढून आवळे, चिंचा,पेरू जांभळे,ओवळे, (बकुळफळे) काढून खाणे, गाभुळलेल्या चिंचेच्या स्वर्गीय चवीचा आनंद घेणे, शाळेत जाता, येताना तोरणे, करवंदे, कणेर खाणे ही कोकणातील खरी मजा. विविध चवीचे रायवळ आंबे चाखणे, हातावर ओघळलेला आंब्याचा रस म्हणजे अलौकिक आनंद. दगडावर ओली काजू बी घासून, पायाच्या टाचेने आतील काजूगर काढून व तो डोक्यावर पुसून खाणे, फणसाच्या झाडाच्या फांदीवर बसून झाडपिक्या फणसातील गरे काढून खाणे, काटेऱ्या अळूच्या झाडावरील अळू काढून ते राखेत पिकायला ठेवून नंतर मित्रांसोबत त्यांचा स्वाद घेणे, भाजीच्या फडातील काकड्या, चिबूड रात्रीच्या वेळी गुपचूप काढून खाण्यातली मौज काही औरच.
पर्यात, ओढ्यात (व्हाळात) मासे पकडून ते कुंभ्याच्या पानात बांधून तयार केलेला व निखार्यात भाजलेला ‘मोटला’ खाल्ला आहे काय? कांडाळ, इंद, खोईण वापरून नदीतील मासे, किर्व्या (कुर्ल्या) पकडणे, मेणे घालून नदीतील मासे पकडणे काय असते ते एकदा कोकणात येऊन पहाच. तुलशीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पारंपारिक वाघबारसेच्या कार्यक्रमात भाग घेऊन मित्रांसोबत नदीकाठी जेवयला जाण्यासारखा आनंद नाही. करांदे, घोरकंद, शेवरकंद, करांदे, काटेकणगर यांचा चुलीत भाजून आस्वाद घेणे. गावठी पोह्यानी भरलेल्या बशीत चहा ओतून ते खाल्लेत काय ? नाही? मग याच एकदा कोकणात.
आंब्याच्या झाडावरून पडणारे आंबे चपळपणे धाऊन जाऊन व जमवून झाडाखालच्या घरगुटल्यात ठेवणे, अनवाणी पायाने माळावर फुललेल्या कोचावरून कौशल्याने धावत जाणे, चिव्यापासून फिटनळी बनवून तिच्यात चिरफळे किंवा अळूच्या पानांचा गोळा भरून उडवणे, मे महिन्याच्या सुट्टीत नदीवर वायंगणी शेतीसाठी बांधलेल्या घरणात मनसोक्त डुंबणे, गावात झालेल्या नमनात (खेळे) सुरूवातीपासून बसून असंख्य गुदमरवणाऱ्या वासांचा मुकाबला करून रावणाची पाटी नाचेपर्यंत जागणे म्हणजे कोकण.
गुराना पाणी पाजायला नेताना रेड्याच्या किंवा म्हैशीच्या पाठीवर बसून रपेट मारणे, खळ्यात नाचणी, हरीक यांच्या मळणीत काम करणे, अंगणातील किंवा खळ्यातील माती खणून नंतर ती चोपण्याने चोपणे, बिरंबोळे खणून काढून खाणे, गोमेटे खाणे, तर कधी कातभट्टीवर तिखट जेवण जेवणे ही तर खरी मजा.
कधी चांदण्यातून बैलगाडीत झोपून प्रवासाचा आनंद घेणे, कधी अडीत घातलेले गरमागरम, रसदार रायवळ आंबे चाखणे, कधी चुलीत काजू खमंग भाजून त्यांचे गर खाणे, फणसाच्या अठल्या चुलीत भाजून खाणे, अबयची बी दगडावर घासून तिचा चटका मित्राच्या मांडीला देणे, सागाची पाने चिव्याच्या काठीवर लावून त्यांची छत्री बनवणे, कधी इरले डोकियावर घेऊन किंवा घोंगडी डोक्यावर घेऊन जोरदार पावसातून जालत जाणे, पिरस्यावर वाळत घातलेल्या घोंगडीतून निघणारा वास अनुभवणे म्हणजे कोकण. कधी गावपारधीला जाणे, माळावर फासक्या लावून कवडे, ल्हावे पकडणे, शिमग्यातून पालखी नाचवणे, घरातील कोंबडीला घार, कोल्हा मुंगूस पकडून नेत असताना पाठलाग करून तिला सोडवणे म्हणजे कोकण अनुभवणे. हे खरे कोकणातील जीवन जगणे आहे.
- राजापूरकर या फेसबुक वॉलवरुन साभार
कोकणची सफर राजापूरकर च्या नजरेतून : राजापूरकरचे फेसबुक पेज Follow करत रहा.
Instragram – Facebook – Twitter @राजापूरकर
#राजापूरकर
#treesphotography #beauty_nature
#naturegeography #quotesaboutlife
#konkangram #naturehome
#beauty_nature #kokanchi_shan
#morningmotivation #cow #nature_perfections #beachphotography #konkanphotographers #maharashtra_clickers_ #konkan_photography #kokancha_nisarga #treehouse #india_ig #india_undiscovered #discover_india #mobility #konkan_ig #world_photography_page #insta_maharashtra #naturelovers #kokancha_nisarga #blessedlife #facts
#Rajapurkar