
कोंढवा-वानवडी परिसरात बेकायदेशीरपणे लाखोंचे व्यवहार
पुणे : पुण्याच्या कोंढवा-वानवडी परिसरात अल्पावधीत बक्कळ पैसा कमविण्यासाठी ‘हेवी डिपॉझिट’वर घरे भाड्याने देण्याचा नवा गोरखधंदा सुरू झाला आहे. या माध्यमातून लाखो रुपयांचे बेकायदा आर्थिक व्यवहार केले जात आहेत. झपाट्याने उभी राहत असलेली बेकायदा बांधकामे, भाड्याच्या घरांना असलेली मागणी यामुळे हेवी डिपॉझिटचा धंदा बोकाळत चालला आहे. गेल्या काही दिवसात कोंढवा पोलीस ठाण्यात यासंदर्भातील १० पेक्षा अधिक तक्रारी आल्या असून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. हा भाग मुस्लिमबहुल लोकसंख्येचा आहे. याभागात अत्यंत दाटीवाटीची घरे आहेत. बहुतांश बांधकामे ही अनधिकृत आहेत. आपापल्या आवश्यकतेनुसार अनेकांनी याभागात घरे घेतली असून अनेकांनी गुंतवणूक म्हणून सदनिका घेऊन ठेवलेल्या आहेत. या रिकाम्या सदनिका भाड्याने देण्याचा सपाटा सुरू आहे. कोंढवा भागात सदनिका भाड्याने देत असताना एक मोठी रक्कम भाडेकरुकडून घेतली जाते. घर सोडताना ही रक्कम परत करण्याची अट असते. ही रक्कम घर मालक वापरतो. त्याचे व्याज अथवा गुंतवणुकीवरील फायदा घर मालक भाड्याच्या स्वरूपात घेतो. साधारणपणे तीन ते दहा लाखांपर्यंतचे एकरकमी डिपॉझिट घेतले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घर भाड्याने देत असताना भाडेकरू कोण आहे, त्यांची पार्श्वभूमीवर काय आहे, याची माहिती देखील घेतली जात नाही.
कोंढवा पोलीस ठाण्यात हेवी डिपॉझिटमधून फसवणूक झाल्याच्या तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. आत्तापर्यंत जवळपास १० पेक्षा अधिक लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चार गुन्ह्यात १२ लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. घर भाड्याने देताना किंवा घेत असताना दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, दोन्ही बाजुंनी ही नोंदणी करण्याबाबत उदासीनता असल्याने भाडेकरूंचे पैसे हडपण्याचे प्रकार वाढले आहेत.
हेवी डिपॉझिटवर घरे भाड्याने देण्याचा धंदा कोंढवा परिसरात फोफावत चालला आहे. हेवी डिपॉझिटमधून फसवणूक झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. भाडेकरूंना लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांनी घरे भाड्याने घेताना आणि देताना रीतसर दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. घराची मूळ कागदपत्रे तपासूनच व्यवहार केल्यास फसवणूक टाळता येऊ शकते. ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
कशी केली जाते फसवणूक?
घर मालकाने घर भाड्याने दिल्यानंतर भाडेकरू हा पोटभाडेकरू ठेवतो. पोटभाडेकरू ठेवताना लाखो रुपये एकरकमी घेतले जातात. या रकमेच्या व्याजातून भाडे घेतले जाते. घर रिकामे करताना ही रक्कम भाडेकरूला परत देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु, अनेकजन ही रक्कम न देता बोऱ्या-बिस्तरा घेऊन पसार होतात. मालक जेव्हा घर रिकामे करायला येतो तेव्हा भलताच भाडेकरू असल्याचे लक्षात येते. त्यानंतर घर रिकामे करण्यावरून आणि डिपॉझिट म्हणून दिलेली रक्कम मिळण्यावरून वाद सुरू होतात. हे वाद पोलीस ठाण्यात पोचतात. भाडेकरूला घर रिकामे करण्यावाचून पर्याय उरत नाही. घरही गेले आणि पैसेही गेले अशी अवस्था होते.
घर भाड्याने देत असताना किंवा घेत असताना मूळ मालक कोण आहे याची खातरजमा केली जात नाही. त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. भाडेकरूंकडून उकळलेली रक्कम घेऊन पसार झालेल्यांबद्दल तक्रारी वाढत चालल्या आहेत. कागदोपत्री व्यवहार झालेले नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. भाड्याच्या सदनिकांमध्ये राहणारे बहुतांश लोक हे अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे, त्यांची कष्टाची कमाई लुटण्याचा हा गोरखधंदा कसा बंद होणार हा प्रश्न आहे. हेवी डिपॉझिटमधून फसवणूक झालेल्या तक्रारदारांची प्रामुख्याने मागणी पैसे परत मिळावेत अशीच असते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ही काळजी घ्या
दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन भाडेकराराची नोंदणी करताना ती सदनिका अथवा इमारत कायदेशीर आहे की नाही हे तपासले जाऊ शकते. जोडलेली घर मालकाची मूळ कागदपत्रांची तपासणी होऊ शकते. जर नोंदणीचा आग्रह धरला तर फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
तक्रारदारांचे काय आहे म्हणणे?
कोंढव्यात आम्ही घर भाड्याने घेतले होते. त्यावेळी तीन लाख चेकद्वारे आणि ५० हजार रुपये रोख हेवी डिपॉझिटवर देण्यात आले होते. आम्ही साधारण दीड वर्षे या सदनिकेत राहिलो. मात्र, त्यानंतर घराचा मूळ मालक आला आणि त्याने घर रिकामे करायला सांगितले. आम्हाला घर भाड्याने देणारा आधी त्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने घर मालक असल्याचे सांगत आमची फसवणूक केली. याबाबत आम्ही न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आमचे पैसेही मिळाले नाहीत आणि घरही सोडावे लागले.
– तक्रारदार, हाजरा क्रिस्टल, कोंढवा