
भाडेकरुंची भांडणे सोडवायला जाणे व्यावसायिकाला पडले महागात
आमची भांडणे सोडविणारा तु कोण म्हणत त्यांनाच केली बेदम मारहाण, महर्षीनगरमधील घटना
पुणे : भाड्याने दिलेल्या खोल्यांमधील वाहनचालक एकमेकांशी भांडणे करत होती. त्यांची भांडणे सोडविणार्या व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली. या वाहनचालकांनी आपली भांडणे थांबवून तु कोण आमची भांडणे सोडवणारा असे म्हणून त्यांना बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अजिक्य शिवाजी बेंगळे (वय ३२, रा. महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समाधान दिगंबर पाटील (वय ३५), मनोज पाटील (वय ३५, दोघे रा. बॉईज हॉस्टेल अरुणा असफअली उद्यानाजवळ, महर्षीनगर) व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार महर्षीनगरमधील बॉईज हॉस्टेलमध्ये १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य बेंगळे यांचा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी महर्षीनगरमधील एक तीन मजली इमारत भाड्याने घेतली असून त्या ठिकाणी बालाजी बॉईज हॉस्टेल नावाने व्यवसाय करत आहेत. त्या ठिकाणी कॉट बेसीसवर मुले राहण्यासाठी ठेवत असतात. इमारतीच्या तळमजल्यावरील तीन रुम या प्रगती इम्प्रा सर्व्हिस या कंपनीला भाड्याने दिल्या असून कंपनी त्यांच्या वाहनचालकांना तेथे ठेवत असतात.
१८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या बॉईज हॉस्टेलमध्ये मोठा गोंधळ सुरु असल्याचे शेजारी राहणारे अजिंक्य भालेराव यांनी कळविले. ते तेथे पोहचले. तेव्हा तळमजल्यावरील रुममध्ये मोठ्याने गोंधळ चालू होता. कंपनीचे वाहन चालक म्हणून काम करणारे समाधान पाटील, मनोज पाटील व एक अनोळखी यांची भांडणे चालू होती. बेगळे यांनी त्यांना भांडणे का करता, असे विचारले व त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेल़े तेव्हा समाधान पाटील हा म्हणाला की तू कोण आहेस, आमची भांडणे सोडवणारा, असे म्हणून हाताने
त्यांच्या डाव्या डोळ्यावर बुक्की मारली. इतरांनीही त्यांना मारहाण केली. अनोळखी व्यक्तीने रुममधील लॅपटॉपचा चार्जर गोल फिरवुन त्यांच्या तोंडावर मारल्याने ते जखमी झाले. समाधान व मनोज पाटील यांनी त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यांनी आरडाओरडा केल्याने इमारतीबाहेर उभे राहणारे मित्र संगाम शिंदे व आकाश बेगळे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या तिघांनी या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.