
मुलींच्या सुरक्षेविषयी निर्माण झाले प्रश्नचिन्ह
पुणे : छेडछाड आणि रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने औषधाच्या बारा गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खळबळ उडवून देणारी ही घटना पुण्यामध्ये फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याप्रकरणी वाहिद शेख (वय १९, रा. मंगळवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहिद शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पिडीत मुलीने फिर्यादी दिली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी बारा वाजण्याच्या सुमारास आणि ७ ऑगस्ट रोजी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चहा घेऊन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला.
आपला पाठलाग होत असल्याचे आणि छेडछाड होत असल्याचे पाहून मुलगी घाबरली. ती घरामध्ये जाऊन लपली. घाबरलेल्या मुलीने घरामध्ये ठेवलेल्या आजारपणातील औषधाच्या बारा गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तिची आई आणि मावशी यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.