
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक विधींसह मान्यवरांची उपस्थिती
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीने सांगली संस्थानचे राजे गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.

घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून त्रिशक्ती महालामध्ये देवी विराजमान झाली आहे.

धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. याशिवाय श्रीसूक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम
नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तर, सायंकाळी ५.३० वाजता लेखिका/ कवयित्री सन्मान सोहळा आणि डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंजिरी भालेराव यांच्या शुभहस्ते होणार आहे.






