
पुणे : स्वच्छ सहकारी संस्थेच्या सभासद असलेल्या एका कचरा वेचक महिलेने प्रामाणिकपणाचा वास्तूपाठ घालून दिला आहे. कचरा गोळा करीत असताना सापडलेली जवळपास तीन लाख रुपयांची रक्कम त्यांनी मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत केली. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली.
बायडा गायकवाड असे या प्रामाणिक कचरावेचक महिलेचे नाव आहे. त्या गेल्या २० वर्षांपासून सनसिटी परिसरात घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करत आहेत. २४ सप्टेंबर रोजी नियमित कामकाजादरम्यान त्यांच्या ढकलगाडीत एक बॅग सापडली. सुरुवातीला ती कपड्यांची पिशवी आहे असे समजून त्यांनी कचरा वर्गीकरणाचे काम सुरू केले असता, त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तत्काळ बायडा गायकवाड यांनी त्यांचे सहकारी दत्ता वाघमारे आणि दीपाली वाघमारे यांच्या मदतीने पॅराडाईस-२ सोसायटीचे चेअरमन अजित टिंबे यांच्याशी संपर्क साधला. या तिघांनी पोलिसांशी संपर्क साधत ही बॅग थेट पोलिसांकडे सुपूर्त केली. दुपारच्या वेळी कचरा वर्गीकरण करत असताना हेमंत माद्रीकर काहीतरी शोधत असल्याचे बायडा गायकवाड यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती माद्रीकर यांची बॅग हरवलेली असून ते हीच बॅग शोधत असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी बायडा गायकवाड यांनी बॅग पोलिसांकडे दिल्याची माहिती माद्रीकर यांना दिली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी चौकशी करून ती बॅग मूळ मालक हेमंत माद्रीकर यांच्याकडे परत दिली.
या बॅगमध्ये तब्बल ₹२,९०,४२०/- इतकी रक्कम जशीच्या तशी असल्याचे माद्रीकर यांनी पाहिले. बायडा गायकवाड यांच्या या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्यांनी ₹३,०००/- बक्षीस म्हणून त्यांना दिले. गायकवाड यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
एवढी मोठी रक्कम हरवल्यानंतर ती पुन्हा मिळेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. पण आजच्या काळात बायडा ताईंसारखा प्रामाणिक लाखातून एकच माणूस असतो. त्यांच्या या प्रमाणिकटेबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
– हेमंत माद्रीकर






