
मार्केटयार्ड पोलिसांची घनदाट जंगलात कारवाई
पुणे : मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकून पसार झालेल्या महिलांच्या सराईत टोळीला पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पकडत मोठे यश मिळवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील मोहिदेपुर गावातून पाच महिला आणि एक विधिसंघर्षित बालिकेला अटक करण्यात आली. अतिशय चाणाक्ष गुन्हेगारी पद्धती आणि सतत ठिकाण बदलत राहण्याच्या सवयीमुळे या टोळीचा शोध घेणे आव्हानात्मक बनले होते. तरीही मार्केटयार्ड पोलिसांनी गाव, शेतजमिनी आणि जंगलात तासन्तास शोधमोहीम राबवून अखेर सर्वांना जेरबंद केले.
सुनिता पिंटू सोळंकी (२२), मीना रवी सोळंकी (२३), बत्ती गणपत शिंदे (२५), पूजा जगदेव सोळंके (२०), आईना अंकुश सोळंके (२७) अशी अटक महिलांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल होता. तपासाच्या दरम्यान, महिला आरोपी महाराष्ट्राबाहेर बुलढाणा जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. ही महत्त्वपूर्ण माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ एक विशेष तपास पथक रवाना करण्याचे आदेश दिले.
२१ नोव्हेंबर रोजी तपास पथक मोहिदेपुरमध्ये पोहोचताच गावात हालचाल वाढली. आरोपी महिला पोलिस आल्याची चाहूल लागताच गावातून पळून शेतात आणि जवळच्या जंगलात जाऊन लपल्या. यामुळे पोलिसांना तपासात मोठा अडथळा निर्माण झाला. तरीही स्थानिक पोलीस आणि गावचे पोलीस पाटील गोविंदा शिंदे यांच्या मदतीने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तासन्तास छुप्या जागांचा शोध घेतल्यानंतर अखेर सर्व महिला आरोपी विविध ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत सापडल्या. त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले.
पुणे आणि बुलढाणा या शहरांमधील अंतर जवळपास 300 किलोमीटर आहे. हे अंतर कापून पोलिसांनी ही कारवाई केली. शेतात, पडीक जमिनीत आणि घनदाट झुडपांमध्ये लपलेल्या आरोपींना शोधण्यासाठी पथकाला कठोर परिश्रम करावे लागले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले यांचे आदेशाने तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस अंमलदार राजेश थोरात, महेश जेधे, वनिता माने, धनश्री गोफणे, सरतापे, सचीन पवार, दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव यांनी केली.
महिला आरोपी अत्यंत चतुर आणि पोलिसांपासून बचाव करण्यात पारंगत असल्याने ही कारवाई सोपी नव्हती. तरीही पोलिसांनी संयम, सातत्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे टोळीला पकडत गुन्हेगारीविरोधातील महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. मार्केटयार्ड पोलिसांच्या या मिशन-शैलीतील कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#PuneNews #CrimeUpdate #MarketYard #PunePolice #MarathiNews
#BreakingMarathi #CrimeReport #PuneCity #LawAndOrder #MaharashtraNews







