
पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर लिखित ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 17 डिसेंबर रोजी 80 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले कदाचित हे एकमेव नाटक असावे . चिंतामणराव कोल्हटकर यांनी ते गदिमांकडून लिहून घेतले. या नाटकाचे दिग्दर्शन चिंतामणराव कोल्हटकर यांनी केले होते. यात चिंतामणराव कोल्हटकर, जयराम शिलेदार, वसंत शिंदे, चित्तरंजन कोल्हटकर प्रमुख भूमिकेत होते.
नाट्यवाचनाचा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता श्रीराम लागू रंगअवकाश, (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार), हिराबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन करणार असून संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.