
पुणे : बारसाठी आवश्यक असलेले एफएल-३ (दारू विक्री) लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २७.६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खडकी परिसरात घडला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जॉन जोसेफ त्रिभुवन (वय ५३, रा. कँप), ज्ञानेश्वर मावडीकर (वय ६२ रा. बालाजीनगर, कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिलीप मणीकराव वेदपाठक (वय ६५, रा. कुशल नगर सोसायटी,. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भान्यासं ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०२२ ते २९ मार्च २०२५ दरम्यान बोपोडी येथील कुंदन कुशल नगर सोसायटी परिसरात घडला.
तक्रारीनुसार, आरोपी जॉन जोसेफ त्रिभुवन आणि ज्ञानेश्वर मावडीकर यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी “आमचे नातेवाईक एक्साईज विभागात अधिकारी आहेत, त्यांच्या मदतीने अनेकांना लायसन्स मिळवून दिले आहे. तुम्हालाही कमी दरात एफएल-३ लायसन्स मिळवून देतो,” असे सांगून आमिष दाखवले.
या आमिषाला भुलून फिर्यादीने आरोपींना वेळोवेळी रोख, ऑनलाईन व्यवहार व चेकद्वारे एकूण २७,६८,९२३ रुपये दिले. मात्र, आरोपींनी लायसन्स मिळवून न देता तसेच पैसे परत न करता अपहार केल्याचे उघड झाले. आरोपींनी जाणूनबुजून खोटी आश्वासने देत आर्थिक फसवणूक केली आहे.





