
चॅन सिओक जंग ऊर्फ पीटर जंगवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा
पुणे : ‘कॅफे पिटर’ या हॉटेल ब्रँडच्या व्यवहारात सुमारे २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात कॅफे पीटरच्या ब्रँड संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॅन सिओक जंग ऊर्फ पीटर जंग (Chan Seok Jung alias Peter Jung), मूळ रा. दक्षिण कोरिया, सध्या वडगाव शेरी) आणि कमलेश मारुती काळे (वय ३८, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, रा. विशालनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये फिर्यादी यांच्या युमसिंग फूडवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘रिलीफा हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ अंतर्गत चालणारा ‘कॅफे पिटर’ हा हॉटेल ब्रँड ट्रान्सफर अॅग्रीमेंट व असाइनमेंट डीडद्वारे ५ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा करार केला होता. त्यापैकी २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपये आरोपींना देण्यात आले होते.
मात्र, आरोपींनी परस्पर संगनमत करून हा करार रद्द न करता किंवा दिलेली रक्कम परत न करता २०२४ मध्ये ‘कॅफे पिटर’ हा ब्रँड ‘अॅक्सेलार स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.’ या कंपनीला केवळ १० लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. त्यामुळे फिर्यादींच्या कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेली २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम देखील परत करण्यात आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डांगे करीत आहेत.






