
बंडगार्डन पोलीस ठाण्यात बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : तब्बल ३ हेक्टर ९६ गुंठे जमिनीच्या खरेदीखतासाठी वापरण्यात आलेले कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात नसताना तसेच कुलमुखत्यारपत्र दिल्याच्या घोषणापत्रात खोटे कथन करून शासनाची तसेच तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यामधील बांधकाम व्यावसायिकाचा समावेश आहे. हा प्रकार ३० मे २०२५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली ११ या। ठिकाणी घडला.
जयदीप पुखराज जैन (वय ४९, रा. १४८२, सदाशिव पेठ), राजेंद्र दत्तात्रय शिंदे (वय ६५, रा. शुक्रवार पेठ), भीमाशंकर मुचडे (वय ४१, रा. महावीर नगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८, ३(५), सह नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी केतन सुरेश साळुंके (वय ४३, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
तरी सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक-११ येथे दिनांक ३० मे २०२५ रोजी कार्यालयीन वेळेत लिहून देणार व लिहुन घेणार जयदीप जैन यांनी हवेली तालुक्यामधील मौजे च-होली येथील गट नं १३४/४ मधील क्षेत्र ०३ हे ९६ आर. एवढ्या शेतजमीनीचे खरेदीखत केले. हे खरेदीखत गुलाब पठारे यांच्या सन १९८७ च्या कुलमुखत्यारपत्राच्या करण्यात आल्याचे भासवण्यात आले. गुलाब पठारे यांचे १८ मे १९९३ रोजी निधन झाले. हे कुलमुखत्यारपत्र शंकर गुलाब पठारे आणि अन्य लोकांनी दिलेले नव्हते.
तरीदेखील जैन यांनी हे कुलमुखत्यारपत्र शंकर गुलाब पठारे व इतर १० लोकांनी २२ जून २००१ रोजी दिले असल्याचे घोषणापत्रामध्ये नमुद केले. त्या दस्त क्रमांक १३६६९/२०२५ वर राजेंद्र शिंदे व भिमाशंकर मुचडे यांना साक्षिदार केले. या खरेदीखतामध्ये दस्त क्रमांकातील पान क्रमांक ७० मधील घोषणापत्रामध्ये जयराज जैन यांनी दुय्यम निबंधक हवेली – ०८ या कार्यालयात दिनांक २० जून २००१ रोजीचे कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात नसतानाही शंकर पठारे व इतर दहा जणांनी कुलमुखत्यारपत्र दिल्याचे घोषणापत्रामध्ये खोटे कथन करुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता दस्त नोंदणी करुन फिर्यादी तसेच शासनाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.