
पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात घडलेली घटना
पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी रात्री गस्त घालणाऱ्या पुणे पोलिसांवरच हल्ला होण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चौघांनी मिळून मारहाण केली. वेगाने दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना थांबवून विचारणा केल्याच्या रागामधून हा हल्ला करण्यात आला आहे.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद इक्बाल शेख (वय २७), नफीज नौशाद शेख (वय २५), युनूस युसुफ शेख (वय २५), आरिफ अक्रम शेख (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. खडकी भागात गस्त घालत असलेल्या दोन पोलिसांनी भरधाव आणि वेडीवाकडी दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणाला थांबवून विचारणा केली. मात्र, त्या तरुणासोबत असलेल्या इतरांनी देखील वाद घालण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता चौघांनी मिळून पोलिसांवर हात उचलला.
या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसच सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित होतो आहे.