
गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी; नांदेडसिटी पोलिसांत १० जणांविरुद्ध गुन्हा
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवून पाच जणांची सव्वा कोटींची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फसवणूक झालेला व्यक्ती गुंतवलेले पैसे परत मागण्यासाठी आरोपींच्या गावी गेले असता त्यांना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिसांत १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, अयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी हे गुजरात राज्यातील लुणावडा आणि गोध्रा येथे राहणारे आहेत. याबाबत राहुल अर्जुन सुर्यवंशी (वय ३४, रा. धायरी) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक दवे याने फिर्यादी सुर्यवंशी यांच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये संपर्क साधला. त्याने फिर्यादी यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळेल असे प्रलोभन दिले. त्यानंतर सुर्यवंशी यांनी आरोपींना ऑनलाईन आणि रोख स्वरूपात ३३ लाख ७९ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यावर हस्तांतरित केली. त्यासोबतच फिर्यादी यांचे मित्र तसेच ओळखीच्या लोकांकडूनही आरोपींनी ८८ लाख १९ हजार रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली उकळले. सप्टेंबर २०२४ पर्यंत आरोपींनी फिर्यादी यांना परतावा म्हणून दिली. मात्र त्यानंतर फिर्यादी यांना परतावा मिळणे बंद झाले.
त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींकडे गुंतवलेले पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला. मात्र आरोपींकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेले पैसे परत दिले आहे असे भासविण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केले. फिर्यादी यांच्यासह पाच जणांनी एक कोटी २१ लाख ९८ हजारांची आर्थिक फसवणूक केली.
जिवे मारण्याची धमकी
सुर्यवंशी आणि त्यांचे मित्र पैसे परत मागण्यासाठी आरोपींच्या गावी गेले होते. तेव्हा आरोपींनी ‘पुन्हा पैशांची मागणी केल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर सुर्यवंशी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.महिलेची ३६ लाख ५० हजारांची फसवणूक
पुणे: परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ३६ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माधवी श्रीपेरम बुदूर (वय ४४, रा.औंध) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सालिना सिंग तसेच विविध सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मे २०२४ मध्ये हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना विविध बँक खात्यांवर ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मुळ रक्कम परत न देता ३६ लाख ५० हजारांना गंडा घातला. पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.