
जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर हल्ला; चार गोळ्या लागल्याने प्रकृती गंभीर
जामखेड : शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहोळकर याच्यावर बुधवारी (५ मार्च) सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या हल्ल्यात त्याला चार गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. मोहोळकर याने काही महिन्यांपूर्वी कुस्तीच्या एका फडात पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या कानशीलात लगावलेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. मोहोळकर परिसरात उभा असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी सलग पाच ते सहा राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळ्या लागल्यानंतर मोहोळकर रस्त्यावर कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली.
जखमी मोहोळकर याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढे पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मोहोळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि सुमारे महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते.
या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील जुने वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे.





