
मुंबई : केवळ पतीचे वर्तन सुधारण्यासाठी त्याच्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल करण्याच्या कृतीला जोडप्याच्या सुसंवादी संबंधामध्ये स्थान नाही. ही कृती एकप्रकारचे क्रूर वर्तन असून वैवाहिक नातेसंबंधात हे वर्तन स्वीकारार्ह नाही, अशी टिपण्णी नुकतीच उच्च न्यायालयाने केली आणि कौटुंबीक न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवून पत्नीने दाखल केलेले अपील फेटाळून लावले.
पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध खोटा खटला दाखल करणे ही मानसिक क्रूरता असल्याच्या निरीक्षण कौटुंबिक न्यायालयाने एका जोडप्याला घटस्फोट देताना नोंदनले होते. त्या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने नकार देताना उपरोक्त टिपण्णी केली.
पती व नातेवाईकांना खोट्या खटल्यात ढकलले
या प्रकरणात पती आणि त्याच्या नातेवाईकांना अशा गंभीर गुन्ह्यांच्या खोट्या खटल्यात ढकलल्याने त्यांच्यावर झालेले विपरित परिणाम पत्नीला कधीच कळले नाहीत. शिवाय, पती आणि कुटुंबातील सदस्यांना सामाजिक कलंक असल्याचा डाग घेऊन समाजात वावरण्याचे दुःख आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. म्हणूनच, कौटुंबिक न्यायालयाने क्रूरतेच्या र घटस्फोट देण्यास दिलेली संमती योग्यच आधारावर असल्याचे खंडपीठाने अधोरेखीत केले आणि कौटुंबिक न्यायालयाच्या निकालात कोणतीही विकृती, अयोग्यता, खोट आढळून येत नसल्याचेही स्पष्ट करून न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळून लावले.
तिला पतीचे वर्तन सुधारायचे होते
पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना खोट्या फौजदारी खटल्यांना सामोरे जावे लागत आहे आणि पत्नीला पतीचे वर्तन सुधारायचे असल्याने त्यांच्यावर अशा आरोपांखाली गंभीर परीक्षेला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.
पत्नीच्या अशा कृतीमुळे विवाहित जोडप्यांना सामान्यतः परस्पर विश्वास, आदर आणि प्रेमाच्या सुसंवादी नात्यात स्थान मिळत नाही. तसेच एकदा जोडीदाराचे मन पतीविरुद्ध खोटा खटला चालवण्यासाठी तयार झाले की, लग्नाचे पावित्र्य राखण्यासाठी जोडप्याला लागणारी तर्कसंगता आणि तर्कशुद्धता जोडपे गमावून बसते.
जोडीदाराकडून फौजदारी खटल्याच्या खोट्या आणि कठोर कारवाईमुळे, विवाह टिकण्यासाठी आवश्यक अशा मूल्यांना धक्का बसला की, ते क्रूरतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवते. जे हिंदू विवाह कायदा, कलमांतर्गत घटस्फोटासाठी आधार ठरते. पत्नीकडून अशा कृतींमुळे खोट्या कारणासाठी खटला दाखल करणे हे निश्चितच पतीला घटस्फोट मिळण्यासाठी पुरेसे कारण आहे.




