
कपड्याची दोरी करून खिडकीला घेतला गळफास!
पुणे : पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला कैद्याने कपड्याची दोरी करून ही दोरी खिडकीला बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (३ सप्टेंबर २०२५) सकाळी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी अशोककुमार (वय ४५, रा. परनाला, जि. झज्जर, हरियाणा) असे आत्महत्या करणाऱ्या कैदी महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी न्यायालयाच्या आदेशानंतर या महिलेला येरवडा मनोरुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. लक्ष्मी ही परभणी कारागृहात शिक्षा भोगत होती. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने कारागृह प्रशासनाने तिच्यावर उपचाराची गरज असल्याची विनंती परभणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जुलै २०२५ रोजी तिला येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी तिने वॉर्डात अंगावरील कपड्यांपासून दोरी तयार केली आणि ती खिडकीच्या गजाला बांधून गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच मनोरुग्णालयातील डॉक्टरांचे पथक तातडीने वॉर्डात पोहोचले. वैद्यकीय तपासणीत लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर येरवडा पोलिसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून येरवडा मनोरुग्णालयात आत्महत्येच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वीही १० ऑगस्ट २०२५ रोजी खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका पुरुष कैद्याने पायजम्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, याबाबत अधिक कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, येरवडा पोलिसांनी लक्ष्मी आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असले, तरी घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. मनोरुग्णालय प्रशासनानेही या घटनेची अंतर्गत तपासणी सुरू केली आहे.
#PuneNews #येरवडाबातमी #YerwadaSuicide #PuneCrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #PuneUpdates #PrisonNews #CrimeReport #PuneToday #कैद्याचीआत्महत्या #YerwadaNews



