
प्राणदा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मोठी कारवाई
मुंबई : मालाड पश्चिम येथील प्राणदा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल ३१७ बॉक्समध्ये लपवलेला बिनपरवाना व कालबाह्य औषधसाठा जप्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या औषधांचा बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई आयुष्मान भारत PMJAY आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे सदस्य भिमेश मुतुला यांच्या तक्रारीवरून ३१ जुलै रोजी करण्यात आली. त्यांनी प्राणदा बायोफार्मा कंपनीकडून मागवलेल्या केसांच्या तेलामध्ये कालबाह्यता आणि परवानगी नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. FDA आणि इंटेलिजन्स ब्रँचच्या संयुक्त कारवाईत गोदामातून बिनपरवाना औषधे, कालबाह्य केसांचे तेल, आणि विविध आजारांवरील प्रतिबंधित औषधांचा साठा सापडला. औषधांचा असा साठा आरोग्यविषयक धोका निर्माण करणारा आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर प्रकार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईनंतर संबंधित कंपनीवर औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीकडून बेकायदेशीर औषधविक्री सुरु असल्याचा संशयही तपासाअंती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी. संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करून ती कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी भिमेश मुतुला यांनी केली आहे.
FDA Commissioner राजेश नार्वेकर यांच्या निर्देशांनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी गोदामांची छाननी होण्याची शक्यता आहे.







