
विवाहितेची पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध तक्रार : चिकूनगुनियाची औषधे भासवत दिली गर्भपाताची औषधे
पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चिकूनगुनियाची औषधे असल्याचे भासवित गर्भपाताची औषधे खाऊ घातली, सासऱ्याने डोक्यावर पिस्तूल ताणली तसेच पतीवर झालेले दोन कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरावरून पैसे आणण्याकरिता शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची तक्रार एका विवाहितेने विमानतळ पोलिसांकडे दिली आहे. एवढेच नव्हे तर पतीने अनैसर्गिक शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, सासूने शिवीगाळ करीत गरम तव्यावर या विवाहितेचे हात ठेवून चटके दिल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
विमानतळ पोलिसांनी २८ वर्षी पती, ५३ वर्षीय सासरे, ४८ वर्षीय सासरे, २५ वर्षीय नणंद यांच्यावर भान्यासं ८५, ३५१ (२) (३), ३५२, ११५ (२), ६४(१), ७४, ७७,८९, ७५ (१) (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पिडीत विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २२ ऑगस्ट २०२३ ते आजपर्यन्त घडली. फिर्यादीनुसार, लग्नानंतर फिर्यादी या पतीसह हनीमुनकरीता महाबळेष्वर येथे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सासूने फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात दिलेले सर्व स्त्रीधन असलेले दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशांची, सोन्याचे दागिन्यांची व भेट वस्तूंची मागणी केली. त्याला फिर्यादीने सुरुवातीला नकार दिला. मात्र, त्यांनी वेळावेळी शिवीगाळी करुन अपमानास्पद वागणूक देत छळ सुरू केला.
पतीने वेळोवेळी जबरदस्तीने, इच्छेविरुध्द नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याला नकार दिला असता देखील मोबाईलमध्ये या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डीग केले. हे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी दिली. फिर्यादी गर्भवती राहिलेल्या असताना पतीने त्यांना चिकनगुनिया आजारावरील गोळ्या औषधे असल्याचे भासवित गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात घडवला.
फिर्यादीला त्रास होत असतानाही त्यांनी दवाखान्यात नेले नाही. फिर्यादी माहेरी निघून गेल्या असतं पतीने माहेरील घरी येऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी सासरी परत आल्यानंतर सासऱ्यांनी विनयभंग केला. त्यावेळी सासुने शिवीगाळ करुन त्यांचा हात धरुन तो गरम तेलकट तव्यावर ठेवत चटके दिले.
त्यानंतर पतीला हा प्रकार सांगितलं असता त्याने शिवीगाळ करुन धमकावले. त्याचवेळी सासऱ्याने पिस्तूल आणून फिर्यादीवर ताणले. त्यांना शिवीगाळ करीत पतीवर असलेले २ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.







