
पुणे : नवले पुलाजवळील आपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावर उभ्या असलेल्या एका बसला पाठीमागून मोटारीने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मोटारीमधील तरुण वाढदिवसाची पार्टी करून पुण्याकडे परत येत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव पुलाजवळ एक बस उभी होती. या बसला पाठीमागून आलेल्या मोटारीने जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. वाढदिवसाची पार्टी करून हे सर्व तरुण घराकडे परतत होते. या मोटारीमध्ये एकूण सहाजण होते. त्यापैकी दोन तरुण जागीच ठार झाले. तर, उर्वरीत चारजण जखमी झाले. या चौघांना नवले हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.