
अश्लिल मेसेज पाठविणारा कर्मचारी सायबर पोलिसांच्या जाळ्यात : कंपनीमधील तरुणीचे चोरुन काढले होते फोटो
पुणे : एआयचा वापर करुन महिलेचे फेक अकाऊंट तयार करुन अश्लिल मेसेज पाठवले. ते अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्यास सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सुदर्शन सुनिल जाधव (वय २५, रा. मेदनकरवाडी, आळंदी फाटा, चाकण) असे या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुदर्शन जाधव हा काम करीत असलेल्या कंपनीतील तरुणीचे चोरुन फोटो काढून त्याने हा उद्योग केल्याचे उघड झाले आहे. याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणीच्या नावाचा व एआयचा वापर करुन तिच्या फोटोंचा गैरवापर करुन बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावरुन वेळोवेळी अश्लिल मेसेज पाठविले. तसेच एआयचा वापर करुन या महिलेचे अश्लिल फोटो, मेसेज तयार करुन सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्याची धमकी तिला देण्यात आली होती.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व इतरांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मोबाईल कंपनी यांना पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्यावरुन मोबाईल धारकाकडे तपास केला. त्याने या कालावधीतमध्ये त्याचा मोबाईल गहाळ झाल्याचे व त्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली. या गुन्ह्यासाठी आरोपीने वापरलेले फेक इन्स्टाग्राम आयडीचे आयपी प्राप्त केले. त्यातनू संशयित मोबाईल नंबर मिळवून पोलीस सुदर्शन जाधव याच्यापर्यंत पोहचले. त्याला अटक केली.
जाधव याने सापडलेल्या मोबाईलचा व सीमचा वापर करुन या गुन्ह्यासाठी एका एआय अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे सुदर्शन जाधव यांनी त्याच्या कंपनीत कामाला असलेल्या तरुणीचे चोरुन फोटो काढले. माहिती प्राप्त करुन हा गुन्हा केल्याचा निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला असून अधिक तपासासाठी त्याला चिखली पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, प्रविण शेळकंदे, वैशाली बर्गे, स्वप्नील खणसे यांनी केली आहे.




