
पुणे : अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार चंदननगर येथे उघडकीस आला आहे. एका १४ वर्षांच्या मुलीला २९ वर्षीय तरुणाने आपले लैंगिक अवयव दाखवीत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ७५ सह पोक्सो ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या ३८ वर्षीय चुलतीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधी दरम्यान वेळोवेळी घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी १४ वर्षांची आहे. आरोपी तिच्याच परिसरामध्ये राहण्यास आहे. आरोपीने या मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. स्वतःच्या पॅन्टची चेन काढून लैंगिक अवयव तिला दाखवला. तसेच, त्याने त्याच्या मोबाईलमधील अश्लील फोटो तिला दाखवून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत पीडित मुलीने कोणाकडे वाच्यता केली नव्हती. परंतु, आरोपीकडून वारंवार अशी कृत्य घडू लागल्याने तिने या संदर्भात चुलतीकडे तक्रार केली. त्यानंतर चुलतीने यासंबंधी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चंदन नगर पोलिसांकडून सुरू आहे.
तर बिबवेवाडी पोलिसांनी ४३ वर्षीय वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वीस वर्षीय पीडित तरुणीने फिर्यादी आहे. आरोपी वडिलांनी वाईट हेतूने फिर्यादीच्या अंगावर ठिकठिकाणी अश्लील स्पर्श केले आणि तिचा विनयभंग केला. तसेच दारू पिऊन आल्यानंतर तिला आणि तिच्या बहिणीला तसेच आजीला शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार दाखल केली तर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. बिबवेवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.