
तीन अल्पवयीनांसह चार जणांची टोळी जेरबंद
पुणे : अलीकडच्या काळात स्त्री-पुरूषांच्या समलैंगिक संबंधांच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशा प्रकारचे ‘गे’ आणि ‘लेस्बियन’ तरुण-तरुणी विविध प्रकारचे ‘मोबाईल अॅप’ वापरतात. आता हेच अॅप लुटमारीचा धंदा बनू लागले आहेत. अशाच प्रकारच्या ‘ग्राइंडर’ या अॅपचा वापर करून समलैंगिक तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तरुणांना निर्जनस्थळी बोलावून त्यांना कोयत्याचा धाक दाखवीत लुटणारी ही टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ जानेवारी रोजी सायंकाळी डीएसके विश्व शाळेमागे घडला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा स्वत:चा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी गुगल प्ले स्टोअरमधून ‘ग्राइंडर अॅप’ डाऊनलोड केले होते. त्यानं या अॅपवर १३ जानेवारी रोजी एका मुलाने मेसेज केला. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटींगवर बोलणे सुरू झाले. त्या संवादामधून त्यांचे भेटायचे ठरले.
संबंधित मुलाने फिर्यादीला ‘डीएसके विश्व’ सोसायटीच्या कमानीजवळ बोलावून घेतले. फिर्यादी तेथे पोचल्यावर संबंधित मुलगा तेथे आला. फिर्यादीची दुचाकी तेथेच लावून आरोपी मुलाने त्यांना त्याच्या गाडीवर बसवून जवळच्या एका शाळेमागे नेले. तेथे पोचताच अचानक आणखी तिघे तेथे आले. मेसेज केलेल्या मुलाने फिर्यादीला शिवीगाळ सुरू केली. हत्याराचा धाक दाखवत जबरदस्तीने त्यांच्या खिशामधून पैसे, मोबाईल व कानातील दोन सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. मोबाईलमधील ‘फोन पे’ अॅपचा पासवर्ड घेऊन ५ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. एकूण २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून ते चौघे तेथून पसार झाले. घाबरलेल्या फिर्यादीने आपली बदनामी होईल या भीतीपोटी कोणाकडे याबाबत वाच्यता केली नाही. दरम्यान, पोलिसांनी समाजमाध्यमात फिरत असलेल्या एका मेसेजवरून आरोपींचा शोध घेतला. फिर्यादी यांची लूट झाल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. त्यानुसार, त्यांनी फिर्याद दिली.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त बापूरसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुणगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेंगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली.
अशी करायचे लूटमार
आरोपी तरुण समलैंगिक लोकांशी ‘ग्राइंडर अॅप’द्वारे मैत्री करतात. त्यांना निर्जनस्थळी भेटायला बोलावतात. समोर कोवळा तरुण दिसल्याने भाळलेले समलैंगिक लोक अशा ठिकाणी जातात. निर्जनस्थळी जाताच या मुलांचे अन्य साथीदार अचानक हातात हत्यारे घेऊन येतात. हत्याराचा धाक दाखवत पैसे, मोबाईल, सोने, महत्वाचा ऐवज लुटून पसार होतात. तसेच. ऑनलाईन व्यवहार करून स्वत:च्या खात्यात पैसे देखील वर्ग करुन घेतात. बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही. त्यामुळे या आरोपींचे फावले होते.
असा लागला आरोपींचा शोध
‘डीएसके रोड’ ते ‘रायकर मळा’ येथे काही तरुण गाड्या अडवितात. आपल्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे, असे सांगून गाडीत बसतात. गाडी घरी घेण्यास सांगून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करतात. त्यानंतर, पैसे, मौल्यवान ऐवज लुटतात, असा मेसेज समाजमाध्यमामध्ये फिरत होता. पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय जाधव यांना याबाबत खबऱ्याने आरोपींची माहिती दिली. त्यानुसार, नांदेड सिटी पोलिसांनी सापळा रचला. तिन अल्पवयीन मुलांसह एकूण चौघांना पकडण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून लुबाडणुक करण्याचा नवा प्रकार समोर आल्याने पोलीसही हैराण झाले आहेत.