
सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन; ‘एक जिंदादिल युग संपले’
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार, सदैव हसतमुख आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे महान कलाकार धर्मेंद्र यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. अत्यंत देखणा, रुबाबदार अभिनेता सिनेसृष्टीने गमावला. पंजाबच्या एका लहान खेड्यामधून मुंबईत आलेल्या धर्मेंद्र यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर त्यांनी यशाला गवसणी घातली. त्यांनी मातीशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यामुळेच की काय गावच्या आठवणीत त्यांनी शेवटची अनेक वर्ष आपल्या फार्म हाऊसवर घालवली.

सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातून ऍम्ब्युलन्स बाहेर जाताना दिसली आणि काही वेळातच अनेक सेलिब्रिटी जुहू येथील स्मशानभूमीकडे रवाना झाल्याचे दिसून आले. कुटुंबीयांकडून अधिकृत घोषणेसाठी मात्र प्रतीक्षा होती. दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर यांनी “एक युग संपले” अशी भावूक पोस्ट टाकत या दु:खद बातमीची जणू पुष्टीच दिली. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या महिन्याभरापासून ठीक नव्हती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्जनंतर कुटुंबीयांनी “ते सावरत आहेत” असे सांगितले होते. मात्र, आज अचानक परिस्थिती गंभीर बनली आणि अखेर ही दुःखद घटना घडली.

धर्मेंद्र हे फक्त एक सुपरस्टार नव्हते… तर त्यांचे रसिकांशी भावबंध जोडलेले होते. त्यांची साधी, माणुसकीने भरलेली वागणूक, सहजपणे मनात घर करणारे व्यक्तिमत्त्व आणि पडद्यावरची मोहक उपस्थिती यामुळे ते प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती बनले होते. शोलेमधील वीरू असो वा ॲक्शनपटातील ‘ही-मॅन’, धर्मेंद्र यांनी प्रत्येक भूमिकेला मनापासून न्याय दिला.

६ दशकांची कारकीर्द, ३०० पेक्षा अधिक चित्रपट
साठहून अधिक वर्षांचा त्यांचा अभिनय प्रवास होता. त्यांनी जवळपास ३०० चित्रपट दिले. हीच त्यांची अजरामर ओळख आहे. त्यांचा शेवटचा सिनेमा श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा असून या सिमेनात अगस्ती नंदा आणि जयदीप अहलावत देखील आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांसाठी ही एक भावूक परंतु अमूल्य भेट ठरेल.

संपूर्ण देशात दुःख
जुहू स्मशानभूमीत चित्रपटसृष्टी जमा होत असताना सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या आठवणी, क्लिप्स, संवाद आणि भावूक पोस्टचा महापूर आला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग आज संपले आहे. आणि त्या युगाचा सर्वात तेजस्वी तारा शांतपणे मावळून गेला आहे.

बालपण
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे खरे नाव धरम सिंह देओल होते. त्यांचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते. जुन्या काळातील अभिनेत्री सुरैया यांचा ‘दिल्लगी’ हा सिनेमा त्यांनी पाहिला आणि त्यांनी ठरवले आपण देखील अभिनय करायचा. फिल्मफेअर नव्या कलाकारांच्या शोधात असल्याची माहिती मिळताच त्यांनी अर्ज भरून टॅलेंट हंटमध्ये सहभाग घेतला. आणि सुदैवाने त्यांची निवड देखील झाली. त्यानंतर, त्यांनी मायानगरी मुंबईचा रस्ता धरला.

करिअर
मोठ्या आशा आणि उमेद घेऊन मुंबईत आलेल्या धर्मेंद्र यांनी १९६० च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी सर्व प्रकारच्या कथानक आणि अभिनयाची आव्हाने असलेल्या सिनेमांमध्ये काम केले. त्यांना रसिकांचे अमाप प्रेम मिळाले. १९७० च्या दशकात ‘अॅक्शन हिरो’ अशी त्यांची नवी ओळख रूढ झाली. रसिकांनी त्यांना ‘ही मॅन’ अशी उपाधी दिली. १९७५ मध्ये आलेला ‘शोले’ हा चित्रपट त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यांचे आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी सुरु झाली. आपल्या संपूर्ण वाटचालीत ३०० पेक्षा अधिक सिनेमांमधून उत्तम अभिनय करणाऱ्या धर्मेंद्र यांच्या अनेक महिला अक्षरशः वेड्या होत्या. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या.








