
धाडसी पोलीस अधिकारी म्हणून वादळी कारकीर्द राहणार लक्षात
लक्ष्मण मोरे
मुंबई | प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलातील एक धाडसी व चर्चित चेहरा, ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांची सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती झाली असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळाचा शेवट हा गौरवाने आणि कृतज्ञतेने सजलेला ठरला. या निवृत्तीसोबतच एका वादळी कारकिर्दीची सांगता झाला.
निवृत्तीच्या केवळ एक दिवस आधी २९ जुलै २०२५ रोजी दया नायक यांना एसीपी पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांनाही बढती देण्यात आली. ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या दशकांतील निष्ठावान सेवेचा अधिकृत सन्मान मानला जात आहे. यासंदर्भात दया नायक यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर भावनिक पोस्ट करत लिहिले आहे, की “निवृत्तीच्या एक दिवस आधी एसीपीचा गणवेश परिधान केला. जरा उशीर झाला असला तरी, ही भावना पूर्णत्व देणारी आहे.”
२००६ मध्ये अँटी करप्शन ब्युरोने दया नायक यांच्यावर बेकायदा मालमत्ता जमविल्याप्रकरणी अटकेची कारवाई केली. आरोप होता की त्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या पलीकडे संपत्ती जमा केली आहे, विशेषतः कर्नाटकमधील एक शाळा उभारणी प्रकरणामुळे हा संशय निर्माण झाला. यामुळे त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. अखेरीस, सर्व न्यायालयांनी त्यांना निर्दोष घोषित केले व २०१२ मध्ये ते पुन्हा सेवेत परतले. हा वाद त्यांच्या प्रतिष्ठेवर काही काळ विपरीत परिणाम करणारा ठरला. मात्र, त्यांनी पुनरागमन करत अधिक संयमी व समर्पित अधिकारी म्हणून स्वतःची छाप पाडली.
२०१२ साली सेवेत परतल्यानंतर दया नायक यांनी मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट ९ मध्ये पुन्हा जोरदार एन्ट्री केली. २०२१ मध्ये अंटीलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण तपासात्मक भूमिका बजावली. याशिवाय, २०२३ मध्ये सलमान खान यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या धमकी प्रकरणात त्यांच्या युनिटने गुन्हेगारांना शोधून बेड्या ठोकल्या. त्यांनी मुंबईतील विविध अंडरवर्ल्ड नेटवर्कचा खात्मा, छोटा राजनच्या टोळीचे उरलेले नेटवर्क देखील उध्वस्त करण्यास सुरुवात केली. तपासातील अचूकता, गुप्त माहितीची सूत्रे आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे दया नायक पुन्हा चर्चेत आले.
८० हून अधिक एनकाउंटर्स, अंडरवर्ल्डविरुद्ध थेट लढा
१९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झालेले दया नायक यांच्या नावावर १९९७ ते २००५ या काळात ८० पेक्षा अधिक एनकाउंटर्स केल्याची नोंद आहे. त्यांनी केलेल्या एनकाऊंटर्समध्ये प्रामुख्याने दाऊद इब्राहिम, छोटा राजन टोळीशी संबंधित गुन्हेगारांचा समावेश होता. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘अब तक छप्पन’ हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित होता, ज्यात नाना पाटेकर यांनी त्यांच्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. चित्रपटात दाखवलेले ५६ एनकाउंटर, अंडरवर्ल्डविरुद्धची झुंज, आणि पोलीस यंत्रणेतील अंतर्गत राजकारण ही दया नायक यांच्या अनुभवावर आधारलेले होते. या चित्रपटामुळे दया नायक हे ‘पोलीस दलातील हिरो’ म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपटामुळे एकीकडे लोकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल कुतूहल वाढले, तर दुसरीकडे मानवी हक्क संघटनांनी एनकाउंटर पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वादग्रस्त काळ आणि पुनर्प्रवेश
२००६ मध्ये दया नायक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सुमारे सहा वर्षे ते निलंबित होते.
२०१२ मध्ये सर्व आरोप न्यायालयाने फेटाळले आणि त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले.
२०२४ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी त्यांना बढती मिळाली आणि २०२५ मध्ये एसीपी पदाची अंतिम मान्यता देण्यात आली.