
गुन्हे शाखेच्या पथकाने धाडले यमसदनी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळ लांबोटी येथे उडाली चकमक
पोलिसांच्या अचूक निशाण्याने ‘हट्टी’ला टिपले
पुणे : गुन्हेगाराला कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात अडकावेच लागते. गुन्हेगारीचा अंत नेहमी करूण आणि भयंकर असतो. अशाच एका गुन्हेगाराला पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर या आरोपीने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या सराईताचा खात्मा झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळनजीक असलेल्या लांबोटी येथे रविवारी (दि. १५ जून) रोजी पहाटे तीन वाजता ही चकमक उडाली.
शाहरूख उर्फ हट्टी रहीम शेख असे त्याचे नाव आहे. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता. शाहरुख शेख याच्यावर काळेपडळ पोलीस ठाण्यात बीएनएस ३०८(२), ३२९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरून नेल्याप्रकरणीनोमान सय्यद (वय २०, रा. हडपसर) आणि शाहरुख शेख याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमर शकील शेख (वय २१, रा. मोहंमदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी एका फूड डिलिव्हरी अँपवरून आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्याकरिता मोटारसायकलवरून जात होते. त्या वेळी तिनजनांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व ६३० रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केला. तो त्यांच्या कानावर लागला होता.
त्यानंतर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष্ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जरखमी करून दहशत पसरविली होती. ही घटना सय्यदनगर येथे १४ मार्च रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून सराईत नोमान सय्यद याला अटक केली होती. नोमान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ६ गु्हे दाखल आहेत. तर, शाहरुख ऊर्फ हट्टी पसार झाला होता. तो मार्च महिन्यापासून फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळ असलेल्या लांबोटी गावामध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे पथकासह मोहोळ पोलीस ठाण्यात गेले. मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लांबोटी येथे जाऊन शाहरुख याला पकडण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन सुरू होते.
त्यावेळी शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे. दरम्यान पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली. शाहरुख याला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शाहरुख याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत शाहरुखने केलेल्या गोळीबारात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप खात्रीलायक वृत्त हाती आलेले नाही.