
आमदार दरेकरांकडून कवितेच्या माध्यमातून अभिनंदन
नागपूर: विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आज महायुतीतर्फे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
विधान परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली एकमताने निवड केली हे आपले भाग्य आहे. यावेळी दरेकर यांनी ‘उपसभापती होत्या नीलम गोऱ्हे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे… विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम!!’, अशी कविता केली.
राम शिंदे राजकारणातील अजात शत्रू आहेत. आमदार, पक्षाचा पदाधिकारी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून चांगली कारकीर्द, चांगला स्वभाव राम शिंदे यांचा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. चौडीच्या सरपंच पदापासून ते आज सर्वोच्च अशा सभापती पदापर्यंत पोचण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. आज उच्च पदावर बसला आहात. सर्वच नेत्यांनी अभिनंदनाची भाषणे करताना चांगले संदेश दिले. राजकारणातील लोकांना एक चांगला संदेश आयुष्यात मिळतो कधी नाही मिळत. म्हणून तुम्ही लोकांसाठी चांगल्या पद्धतीचे काम करत राहा अशा पद्धतीचा संदेश दिलाय.
तसेच ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना कधी वाटले नव्हते की उपमुख्यमंत्री होईन. त्यांना सर्वतोपारी राज्याचे हित महत्वाचे आहे, कोण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राचे हित जपायचेय ही चांगली भावना महाराष्ट्राच्या संस्कृतीत होताना दिसतेय. श्रद्धा सबुरी हा साईबाबांचा मंत्र सर्वांनाच आचरणात आणण्याची सवय लागलीय. श्रद्धा सबुरी एवढा चांगला जीवनातील कोणता मंत्र नाही आणि राम शिंदे यांनाही साईबाबांचा श्रद्धा सबुरी हा मंत्रच कामी आला, असेही दरेकर म्हणाले.
आपण ज्या धनगर समाजातून आले तेव्हा वाटले होते समाज पाठीशी उभा राहीला. परंतु जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. या राज्यातील सर्वोच्च सन्मानाचे पद धनगर समाजाला देऊन त्या समाजाचा अभिमान, मान उंचवण्याचे काम भाजपा आणि महायुतीने केलेय त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनाही धन्यवाद देतो. आपली कामगिरी दैदिप्यमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.