
रोकड, परकीय चलन आणि क्रिप्टोकरन्सी जप्त
पणजी : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा), १९९९ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. २८ व २९ सप्टेंबर रोजी गोवा, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि राजकोट येथील तब्बल १५ ठिकाणी छापा टाकत झडती घेण्यात आली. ही कारवाई M/s. Golden Globe Hotels Pvt. Ltd., M/s. Worldwide Resorts and Entertainment Pvt. Ltd. तसेच गोव्यातील प्रसिद्ध ‘बिग डॅडी कॅसिनो’ यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर करण्यात आली.
झडती दरम्यान ईडीच्या पथकाने मोठ्या प्रमाणावर रोकड, परकीय चलन आणि डिजिटल पुरावे जप्त केले. यात सव्वादोन कोटी रुपयांचे भारतीय चलन, १४ हजार अमेरिकन डॉलर्स आणि सुमारे साडे आठ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
याशिवाय, तपासादरम्यान विविध क्रिप्टोकरन्सीज आढळून आल्या असून, त्यात USDT सह ९० लाख रुपयांहून अधिक किमतीची क्रिप्टो मालमत्ता फ्रीझ** करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कागदपत्रे व डिजिटल पुराव्यांच्या आधारे विदेशी चलनातील अनियमिततेचा तपास पुढे नेण्यात येणार आहे. या कारवाईनंतर गोव्यातील कॅसिनो व्यवसाय आणि त्यातील आर्थिक व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.