
दांडेकर पूल परिसरातील घटनेने खळबळ; मुलाला अटक
पुणे : दारूच्या नशेत झालेल्या वादातून मुलाने वडिलांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दांडेकर पूल परिसरात घडली असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र उद्धव भालेराव (वय ६१, रा. सर्व्हे क्र. १३०, दांडेकर पूल) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या खुनाच्या आरोपावरून मुलगा सागर (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भालेराव हे सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होते, तर सागरही छोटे-मोठे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ७) दोघेही दारूच्या नशेत असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले आणि रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. आग लागल्यानंतर परिस्थिती गंभीर होताच सागरनेच आग विझवण्याचा प्रयत्न करत जखमी वडिलांना ससून रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय तपासणीत रवींद्र भालेराव हे सुमारे ५० टक्के भाजल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पर्वती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद आणि व्यसनाधीनतेमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.




