
कौसरबाग सोसायटी अध्यक्षाला खंडणीची मागणी
गुंडांना खंडणी न दिल्याने महापालिकेची अतिक्रमण कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल़
पुणे : नव्याने निवडुन आलेल्या कोंढव्यातील कौसरबाग सोसायटीच्या अध्यक्षाला ५ लाख रुपये व दरमहा ५० हजार रुपयांचा हफ्ता देण्याची गुंडांनी खंडणीची मागणी केली. ही खंडणी न दिल्याने महापालिकेने कौसरबाग सोसायटीत अतिक्रमण कारवाई केली. यापुढेही कारवाई थांबविण्यासाठी खंडणी मागणार्या दोघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुबेर मोमीन (रा. कोंढवा खुर्द) आणि झिया शेख (रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत कौसरबाग सोसायटीचे अध्यक्ष तौसिफ महमंद इसाक शेख (वय ३९, रा. कौसरबाग सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोसायटीच्या कार्यालयात व अतिक्रमण कारवाई झालेल्या मोकळ्या मैदानात १२ ते १५ ऑक्टोंबर रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसरबाग सहकारी गृहरचना सोसायटीची नुकतीच निवडणुक झाली. तौसिफ शेख यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर ते सोसायटीच्या कार्यालयात असताना १२ ऑक्टोंबर रोजी जुबेर मोमीन व झिया शेख हे तेथे आले. जुबेर मोमीन व झिया शेख यांचा सोसायटीशी काही संबंध नाही. त्यांनी तौसिफ शेख यांना सोसायटीच्या कामामध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी तसेच पुणे महापालिका येथे कौसरबाग सोसायटीचा तक्रारी अर्ज न देण्याकरीता ५ लाख रुपये व महिन्याचे १ ते ५ तारखेपर्यंत ५० हजार रुपयांचे हफ्ता म्हणून द्यावे लागेल, असे बोलून खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर महापालिकेने १५ ऑक्टोंबर रोजी सोसायटीमध्ये अतिक्रमण कारवाई केली. ही कारवाई सुरु असताना जुबेर मोमीन, झिया शेख, एजाज चमडेवाला, जावेद हे त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्ही मागणी केल्याप्रमाणे ५ लाख रुपये व दरमहा ५० हजार रुपये हफ्ता दिला नाही, म्हणून ही कारवाई झालेली आहे. तेथे उपस्थित कमिटी सभासद अकबर जब्बार खान, शेख सलिम शेख, शेख महमद अली, वसिम बागवान यांना शिवीगाळ केली. आमच्या मागणीप्रमाणे पैसे दिले तर अर्जदार भोकरे यांना सांगून पुढील कारवाई थांबवितो. अन्यथा सोसायटीमधील तुमची घरे देखील तोडायला लावतो, असे बोलून धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.


