
कर्नाटक राज्यामधून सुरू होती वाहतूक
पुणे : दौंड पोलिसांनी कारवाई करीत एक ट्रक जप्त केला असून या ट्रकमधून ५४ लाख रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. हा गुटखा कर्नाटकमधून अहिल्यानगरकडे पाठविला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
रवि अर्जुन होळकर (रा. कासुर्डी, ता. दौंड) या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार पवन शंकर माने यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३ (नशाकारक, अपायकारक औषधी द्रव्ये किंवा पदार्थ सेवन करण्यास देणे अथवा विक्री करणे), कलम २२३ (लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करणे), कलम २७४ (खाद्य किंवा पेय पदार्थ अपायकारक होईल अशा पध्दतीने भेसळ करणे), कलम २७५ (अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री करणे) आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ मधील पाच कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधून निघालेल्या या ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा असून हा गुटखा दौंडमार्गे अहिल्यानगरला पाठवला जात असल्याची माहिती ‘डायल ११२’ या क्रमांकावर देण्यात आली होती. त्यानुसार, पोलिसांनी बारामती दौंड – नगर राष्ट्रीय महामार्गावरील गोलराऊंड परिसरात पोलिसांची नाकाबंदी केली. यावेळी वाहनांची तपासणी केली जात होती. कर्नाटकमधून आलेल्या या ट्रकची (केए २९, ए. २५८८) तपासणी करण्यात आली. या ट्रकमध्ये १४१ गोण्या होत्या. त्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची पाकिटे आढळून आली. जप्त केलेल्या गुटख्याचे मूल्य ५४ लाख ९९ हजार ८०० रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकचे मूल्य १० लाख रूपये आहे. पोलिसांनी असा एकूण ६४ लाख ९९ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उप निरीक्षक सुनिल उगले, रमेश कदम, हवालदार एस. डी. राऊत, नितीन बोराडे, निखील जाधव, अमीर शेख, पांढरे, महेश भोसले, अंमलदार संजय कोठावळे, पवन मानेस एच. एस. कुलकर्णी, रमेश कर्चे, फडणीस व नितीन दोडमिसे यांनी केली.