
घाबड पाहून पोलीस देखील चक्रावले
पुणे : अवैध दारूविक्रीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती कोंढव्यात चक्क एक कोटी रुपयांचे घबाड लागल्याने खळबळ उडाली आहे. साध्या प्रोव्हिबिशन कारवाईदरम्यान पोलिसांना एका घरातील बंद कपाटातून तब्बल १ कोटी ८५ हजार ९५० रुपये जप्त केले. शहरातील बेकायदा धंद्यांचे मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडे वस्ती, गल्ली क्रमांक २ येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक निरीक्षक अफरोज पठाण आणि गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात छापा टाकला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. यावेळी अमर कौर उर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग या तिघांना दारू विक्री करताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
दारूविक्रीतून मिळालेली रोख रक्कम हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या राहत्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान बेडरूममधील बंद कपाटाच्या विविध कप्प्यांत लपवून ठेवलेली १ कोटीहून अधिक रोख रक्कम सापडल्याने पोलिसही क्षणभर स्तब्ध झाले. एवढी मोठी रोकड घरात साठवून ठेवण्यात आल्याने हा प्रकार केवळ अवैध दारूविक्रीपुरता मर्यादित नसून, मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कारवाईत अवैध दारू आणि रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल (दारू व इतर साहित्य) घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. कोटींच्या रोख रकमेची स्वतंत्र नोंद करून तीही ताब्यात घेण्यात आली आहे.
ही रक्कम नेमकी कुठून आली, कोणासाठी जमा केली होती, दारूविक्रीव्यतिरिक्त इतर कोणते बेकायदा व्यवहार सुरू होते का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
या छाप्यामुळे कोंढवा आणि परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, बेकायदा दारूविक्रीविरोधात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे आणि त्यांच्या पथकाने केली.
#KondhwaNews, #PunePolice, #IllegalLiquor, #CrimeNews, #ProhibitionAction







